मानेगावातील विद्यार्थी करताहेत धोकादायक इमारतीत ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:16 PM2018-07-23T23:16:43+5:302018-07-23T23:16:59+5:30
चंदन मोघटरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मानेगाव सडक येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे हाल झाले असून इमारत पडक्या स्थितीत आहे. याकडे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व शिक्षकांचे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शालेय परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा उगवलेला असून विषारी श्वापदांचा धोका निर्माण झाला आहे. खेळाच्या मैदानातही जंगली गवत व झाडीझुडपी वाढली आहेत.
लाकडी फाटे सडलेल्या अवस्थेत
वरिष्ठ प्राथमिक शाळेची कौलारू इमारतीचे कौल फुटलेली आहे. फाटे सडलेल्या अवस्थेत आहेत. त्याठिकाणी विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असतात. अनेक वर्ष होऊनही नवीन इमारतीची तरतूद नाही. पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. सेमी इंग्रजी मिडीयमची फलक लावलेली शाळा आतुन पुर्ण ढासळलेली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे शाळांच्या सुविधाकडे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतचा काही निधी जि.प. शाळांवर खर्च केला जातो तसेच विविध शासकीय योजनेतून इमारतीचे कामे केली जातात. मानेगाव सडक येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेला खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
वृक्ष लागवडीची रोपटीही वाळली
शासनाच्या योजनेद्वारे शालेय परिसरात लावण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना देण्यासाठी नर्सतीतून रोपटे बोलविले जातात. मानेगाव सडक येथील शाळेत एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी रोपट्यांची पॉकिटे विखुरलेली आहेत. काही झाडे लावण्यापुर्वी मेलेली आहेत. शासकीय निधीचा दुरूपयोग झाला आहे. लोकांना झाडे लावण्यासाठी दिली नाहीत. मानेगाव येथील शाळेने शासकीय योजनेची चांगलीच विल्हेवाट लावली आहे.