मांगलीचा जलाशय बनू शकतो पर्यटनासह विकासाचा केंद्रबिंदू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:17 PM2023-03-23T15:17:00+5:302023-03-23T15:18:02+5:30

रात्रीला होते प्राण्यांचे दर्शन : लाखनी तालुक्यात एकमेव पर्यटनस्थळ

Mangli Reservoir can become the center of development with tourism! | मांगलीचा जलाशय बनू शकतो पर्यटनासह विकासाचा केंद्रबिंदू!

मांगलीचा जलाशय बनू शकतो पर्यटनासह विकासाचा केंद्रबिंदू!

googlenewsNext

पालांदूर (भंडारा) : लाखनी तालुक्यातील मांगली बांधचे नयनरम्य जलाशय पर्यटकांसाठी आवडते ठिकाण म्हणून पुढे आले आहे. २००८ मध्ये तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, शासन दरबारी पर्यटनस्थळ म्हणून यादीत नाव नसल्याने विकास निधीपासून मांगली बांध रखडलेला आहे.

येथे रामनवमीला भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन पार पाडले जाते. ४८४ एकरांतील भव्य दिव्य विस्तीर्ण तलाव नजरेचे पारणे फेडणारे आहे. तलावाच्या सभोवताल टेकड्या आहेत. विस्तीर्ण हिरवीगार वनराई व त्यातून असलेली पायवाट मनमोहक आल्हाददायक प्रवासाची महती पर्यटकांना भुरळ घालत आहे. या विस्तीर्ण जलाशयातून शेतीसाठी सिंचनही केले जात आहे. वर्षभर मत्स्य शेतीतून उत्पन्नाचे स्त्रोत आजही कायम आहे.

वन विभागाचे या निसर्गरम्य वातावरणात नियंत्रण आहे. वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये, याकरिता वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी कर्तव्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद माजी सदस्य विनायक बुरडे यांनी शासकीय निधीतून या मंदिराचा व परिसराचा कायापालट केला होता. मात्र, आता जिल्ह्यातील पर्यटन यादीतून मांगली बांध वगळण्यात आल्याची चर्चा आहे.

बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर आहे. मंदिरालगत भव्य पटांगण असून, त्यात विस्तीर्ण वनराई सुशोभित दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत. रात्रीला वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी मांगले बांध तलावात गर्दी करतात. या तलावाशेजारी जंगलात मोर, लांडोर, बगळा, विदेशी पक्षी तसेच प्राण्यात वाघ, हरिण, निलगाय, अस्वल, रानडुक्कर, रानकुत्रे असे विविध जातीचे प्राणी मुक्तसंचार करीत आहेत.

मांगली बांध खासगी मालकीचे जलाशय असून, या ठिकाणाहून भातशेतीला सिंचन केले जाते. वन्य प्राण्यांसाठी हा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास अंतर्गत शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पर्यटन स्थळाएवढे महत्त्व येऊ शकते. मांगलीवासीयांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होऊ शकते. सुटीच्या दिवशी बांधावर मोठी पर्यटकांची गर्दी असते.

- मंगला वाघाडे, सरपंच मांगली (बांध)

Web Title: Mangli Reservoir can become the center of development with tourism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.