मांगलीबांध जलाशय बनू शकतो पर्यटनाचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:01+5:30
मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.
मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : निसर्गाच्या मुक्तहस्ताने उधळण ठरलेलं लाखनी तालुक्यातील मांगलीबांधचे नयनरम्य जलाशय पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. या परिसराच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या तलावात उन्हाळ्याच्या दाहकतेत तरुण मंडळी पोहण्याचा आनंद घेत असतात. तलावाशेजारी टेकड्या आहेत. ४८४ एकरात या तलावातून भात शेतीच्या सिंचन केले जाते आणि दरवर्षाला एक लक्ष रुपयांची मत्स्य शेती यातून निर्मिती केली जाते. या तलावात आजही वीस फूट पाणी आहे.
वन विभागाचे या निसर्गरम्य वातावरणात नियंत्रण आहे. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे यांनी या मंदिराचा शासकीय निधी अंतर्गत कायापालट करून रुबाबदार देखणा व पर्यटनासाठी मांगली बांध पात्र ठरला आहे.
मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.
सरपंच प्रशांत मासूरकर व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली गावातीलच तीन तरूणांना या मंदिरात क्वारंटाईन केले आहे. परिसराबाबत ज्येष्ठ नागरिक गजानन मानकर यांनी अभ्यासात्मक माहिती दिली.
रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी मांगलीबांध तलावात गर्दी करतात. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मांगली बांध हे परीचीत असून पर्यटनाच्या दृष्टीने अधिक लक्ष पुरविल्यास निश्चितच भविष्यात मोठे पर्यटन क्षेत्र उदयाला येऊ शकतो, यात शंका नाही.
या तलावाशेजारी जंगलात मोर, लांडोर, बगळा, विदेशी पक्षी तसेच प्राण्यात वाघ हिरण नीलगाय अस्वल रानडुक्कर रानकुत्रे अशी विविध जातीचे प्राणी मुक्त संचार करीत आहेत. या जलाशयाचे व विस्तीर्ण वनराईचे सदस्य आहेत.
मांगली बांध खासगी मालकीचे जलाशय असून या ठिकाणाहून भातशेतीला सिंचन करण्यात आले. वन्यप्राण्यांसाठी हा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास अंतर्गत शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पर्यटन स्थळाएवढे महत्त्व येऊ शकते.
-प्रशांत मासूरकर,
सरपंच, मांगलीबांध.