बाजारात आंब्याचे दर घटले, तरीही ग्राहक खरेदीसाठी फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:36+5:302021-05-12T04:36:36+5:30

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस, कर्नाटकी हापूस हे आंबे खरेदी केले जात नसले तरीही जिल्ह्यात लोकलचे केशर, पायरी, गावरान, ...

Mango prices fell in the market, yet consumers turned to shopping | बाजारात आंब्याचे दर घटले, तरीही ग्राहक खरेदीसाठी फिरकेनात

बाजारात आंब्याचे दर घटले, तरीही ग्राहक खरेदीसाठी फिरकेनात

Next

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस, कर्नाटकी हापूस हे आंबे खरेदी केले जात नसले तरीही जिल्ह्यात लोकलचे केशर, पायरी, गावरान, दशरी, लंगडा यासारख्या आंब्यांना दरवर्षीच प्रचंड मागणी असते, मात्र यावर्षी ग्राहकांनी कोरोनामुळे सावध पवित्रा घेतला असल्याने आंब्याचे दरही गडगडले आहेत, तर दुसरीकडे ग्राहक बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विक्रेत्यांसह आंबा उत्पादकांना कोरोना व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात मे महिन्यात संचारबंदीचे चित्र दिसून येत असतानाच मध्यंतरी एप्रिल महिन्यात सर्वच फळांची मागणी प्रचंड वाढली होती. त्यामुळे दरही गगनाला भिडले होते, मात्र काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने आंब्यासोबत इतर फळांच्या दरात किंचित घट झाली आहे. बाजारात असलेला आंबा हा खराब होण्याच्या मार्गावर आहे. आंबा जास्त दिवस टिकत नसल्याने खरेदी केलेला आंबा आहे त्या किमतीत तरी विकला पाहिजे ही चिंता आंबा विक्रेत्यांना सतावत आहे. सध्या रत्नागिरी हापूस आंब्याचे बाजारातील दर ९०० ते १००० रुपये प्रतिडझन आहेत, तर केशर १२० ते दीडशे रुपये किलो, दशरी साठ रुपये, लंगडा आंबा साठ रुपये तसेच इतर जातीचे गावराण आंबे ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान आहेत. कडक निर्बंध लागू केल्याने फळ विक्रेते दररोज लागणारा मोजकाच आंबा बोलावत आहेत. दररोज ११ वाजेनंतर दुकाने बंद करावी लागत असल्याने म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचे फळ विक्रेते रोशन दिवटे, खुशाल हटवार यांनी सांगितले. प्रशासनाने १५ मेनंतर निर्बंध हटविल्यास त्यापुढे आंबा विक्री व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

बॉक्स

अवकाळी पावसाने लोकल आंब्यांचे नुकसान

जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. त्यातच आंब्याचे उत्पन्नही अनेकजण घेतात. मात्र आठवडाभरापासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने आंबा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मदत देण्याची गरज आहे.

बॉक्स

घरपोहोच डिलिव्हरीची सोय

जिल्ह्यात काही मोजकेच ग्राहक हापूस आंब्याची मागणी करतात. विक्रेत्यांनी घरपोहोच डिलिव्हरीची सोयही उपलब्ध केली आहे. मात्र विशेषकरून रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे दर अद्यापही नऊशे ते हजार रुपये डझनच्या आसपास आहेत. त्या तुलनेत लोकल आंब्याला अनेकांची मागणी आहे.

कोट

जिल्ह्यात फळबागलागवडीसाठी पोषक वातावरण आहे. भंडारा तालुक्यातही फळबागलागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड तसेच एमआरजीएस अंतर्गतही शेतकऱ्यांना फळबागलागवडीची कृषी विभागाची योजना आहे. याचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.

विजय हुमणे, भंडारा मंडळ कृषी अधिकारी, भंडारा

कोट

अनेक ग्राहकांकडून केशर, दशेरी, लंगड्या व लोकल आंब्याला मागणी आहे. मात्र संचारबंदीमुळे व कोरोनामुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. नगर परिषदेने आम्हाला थोडी शिथिलता द्यायला हवी.

रोशन दिवटे, फळ विक्रेता, भंडारा

कोट

आंबा उत्पादक शेतकरी संकटात

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी लदबदली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच झालेल्या वादळी वाऱ्याने अडीच एकरातील आंबे जमीनदोस्त होत मोठे नुकसान झाले. शासनाने मदत करण्याची गरज आहे.

कवळू शांतलवार, आंबा उत्पादक शेतकरी, माडगी

कोट

मी दरवर्षी जिल्ह्यात तसेच नागपूरला आंबा विक्री करतो. मात्र यावर्षी आंब्याला विशेष अशी मागणी नाही. त्यातच कोरोनाचे संकट असल्यानेही अनेक व्यापारी खरेदीसाठी आलेच नाही.

बाबूराव गिऱ्हेपुंजे, आंबा उत्पादक शेतकरी, खरबी

Web Title: Mango prices fell in the market, yet consumers turned to shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.