काँग्रेसचे मनोहर सिंगनजुडे यांचे निधन
By admin | Published: June 6, 2017 12:19 AM2017-06-06T00:19:59+5:302017-06-06T00:20:47+5:30
भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष तथा भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर गणपतराव सिंगनजुडे यांचे सोमवारी सकाळी ११.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष तथा भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर गणपतराव सिंगनजुडे यांचे सोमवारी सकाळी ११.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, एक बहिण व नातवंड असा आप्त परिवार आहे.
खरबी येथील निवासस्थानी सोमवारला सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एका परिचिताला सोबत घेऊन स्वत: चारचाकी चालवित ते तुमसर येथील डॉ.गादेवार यांच्या रूग्णालयात पोहोचले. तिथे उपचारा दरम्यान हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली.
खरबी येथील सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाल्यानंतर मनोहर सिंगनजुडे हे खरबीचे सरपंच बनले. १९९९ ला खापा जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य बनले. २००४ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.
सन २००५ मध्ये तुमसर विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. २०१६ मध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी जवळीक असल्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या नऊ सदस्य संख्या बळावर पटेलांनी त्यांना अध्यक्ष केले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला सकाळी ९ वाजता माडगी स्मशानघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांचे ते मोठे बंधू होत.