रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखत पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:29+5:302021-01-24T04:17:29+5:30
ग्रामीण भागात आजही पशुधन अनेक प्रमाणात आहे. मात्र, हे पशुधन टिकावे याकरिता दुग्ध धोरणाला बळकटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...
ग्रामीण भागात आजही पशुधन अनेक प्रमाणात आहे. मात्र, हे पशुधन टिकावे याकरिता दुग्ध धोरणाला बळकटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुधनाला सशक्त ठेवण्याकरिता पशूंचे आहार महत्त्वाचे असून, ते महाग होत चालले असून दुधाचे भाव मात्र कमी होत आहेत. दुग्ध संघाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या दुधाचे नियमित हप्ते मिळत नाहीत. दुधाला अपेक्षित भाव नाही. पशुखाद्याचे भाव दररोज वाढतच आहेत. अशा एक ना अनेक संकटाने पशुधन धोक्यात आले आहे. पशुधन टिकेल तरच शेती टिकेल हे सूत्र शासनाने अंगीकारत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला पशुधन संवर्धनाकरिता सर्वतोपरी सहकार्य करीत मार्गदर्शन करणे नितांत गरजेचे आहे. चूलबंद खोऱ्यात शेतीत वर्शभर उत्पन्न घेतले जाते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. शेतीत पशुसंवर्धन ही महत्त्वाची गरज असून, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट पशुधनाशी संबंधित मार्गदर्शन शेतकऱ्यांना करीत त्यांना न्याय द्यावा. शेणखत अत्यंत उपयुक्त व गुणकारी आहे. शेतीला शेणखताची जोड मिळाल्यास किडींचासुद्धा त्रास कमी होतो. शेणखताच्या शेतीला संतुलित रासायनिक खताची मात्रा पुरविल्यास चांगल्या उत्पन्नाकरिता मोठी मदत होते.