पवनीचे वैभव नागपूर-मुंबईच्या पुराणवस्तू संग्रहालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 01:20 PM2022-01-13T13:20:11+5:302022-01-13T13:32:40+5:30
पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत.
अशोक पारधी
भंडारा : पौराणिक आणि ऐतिहासिक समृद्धी लाभलेल्या पवनी परिसरात उत्खननात आढळलेल्या अनेक पुरातन वस्तू नागपूर-मुंबईच्या पुराणवस्तू संग्रहालयाचे वैभव वाढवीत आहेत, तर दुसरीकडे पवनीचे वैभव लुप्त होत आहे. बौद्ध धम्म आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी बुद्ध कॉरिडॉर निर्माण करण्याची गरज आहे; परंतु सध्यातरी याकडे कुणाचेही लक्ष नाही.
पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. अलीकडे १८ व्या शतकातदेखील पवनी अत्यंत समृद्ध नगर होते. मात्र, त्यावेळी पेंढारी जमातीने तीन वेळा स्वारी करून पवनीला लुटले. त्यानंतर ब्रिटिश फौजांनी पवनी हस्तगत केली. जगन्नाथ टेकडी, हरदोलाला टेकडी व सुलेमान टेकडी परिसरात उत्खनन झाले. या उत्खननात मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत; परंतु त्या वस्तू आता नागपूर- मुंबई येथील पुराणवस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. उत्खननात सापडलेले पवनीचे वैभव परत देऊन येथेच संग्रहालय तयार करण्याची मागणी आहे.
राजा भगदत्त यांचा शिलालेख
सर्वप्रथम १८७० मध्ये पवनी प्राचीन वसाहत असल्याचा उल्लेख करण्यात आला. मराठाकालीन परकोट १९२७ मध्ये संरक्षित केला. १९३५ मध्ये हरदोलाला टेकडीच्या पश्चिमेस उत्खनन करण्यात आले. त्यात राजा भगदत्त यांचा शिलालेख सापडला. त्यानंतर १९६४, १९६८, १९६९ व १९९४ मध्ये भारतीय पुरातत्व विभाग आणि नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने उत्खनन करण्यात आले.
उत्खननात आढळला भव्य स्तूप
जगन्नाथ टेकडी परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात भव्य स्तूप आढळून आला. तो स्तूप सम्राट अशोककालीन असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या काळात बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार पवनी येथील याच स्तुपातून होत असल्याचे पुरावे उत्खननात पुढे आले.
विखुरलेल्या शिळा आणि खांब
पवनी शहराच्या परिसरात सर्वत्र विखुरलेल्या शिळा आणि कोरीव खांब दिसून येतात. या वैभवाचे जतन करण्याची गरज आहे, तसेच बौद्ध धम्म व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पवनी केंद्र व्हावे, अशी अपेक्षा आहे.