‘फेक’ योजनांचा अनेकांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:14 PM2019-03-02T22:14:38+5:302019-03-02T22:14:52+5:30
सध्या जिल्हाभर बेटी बचाव, बेटी पढाव या केंद्र सरकारच्या न असलेल्या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे. यात ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : सध्या जिल्हाभर बेटी बचाव, बेटी पढाव या केंद्र सरकारच्या न असलेल्या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे. यात ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून असंख्य मुली, त्यांचे पालक तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या प्रमाणपत्राकरिता, तर परिपूर्ण भरलेले फार्म पोस्ट आॅफिसमध्ये फार्मवर नमूद पत्त्यावर पाठविण्याकरिता गर्दी करीत आहेत. या 'फेक' योजनेमुळे अनेक नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
असाच प्रकार भंडारा येथे घडल्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी पोस्टमास्तर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीयांना तत्काळ पत्र लिहून बेटी बचाव बेटी पढाव या योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठीचे फार्म भरण्यासाठी पोस्ट आॅफिस येथे नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. फार्म नमुना भरल्यानंतर एक मुलीच्या शिक्षणाकरिता दोन लाख मिळणार असल्याची खोटी माहिती सोशल मिडियावर आली आहे. त्याद्वारे सामान्य जनतेची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोस्ट आॅफिस समोर सुचना फलक तातडीने लावण्यात यावे, सामान्य जनतेला त्याची माहिती होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र लिहून घडणारा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे पत्र असतानाही पोस्ट कार्यालयामार्फत अधिनस्त असलेल्या तालुका, शहर व गाव पातळीवरील पोस्ट कार्यालयात तशी माहिती दिली नाही.
शुक्रवारपर्यत पवनी येथील पोस्ट कार्यालयात बेटी बचाव बेटी पढाव या खोट्या योजनेचे फार्म भरून पोस्टाद्वारे नोंदणीकृत डाकेने पाठविण्याचे कार्य सुरू होते.
या प्रकाराची माहिती प्रशांत पिसे, प्रकाश पचारे यांना कळताच पोस्ट आॅफिसमध्ये जावून सदरच्या नोंदणीकृत डाक घेवू नये, अशी मागणी केली. मात्र पोस्ट मास्तर यांनी आम्हाला असे कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्यामुळे व पोस्ट आॅफिसचे कामच असल्यामुळे आम्ही अर्ज असलेले पॉकीट घेत आहोत. विभागीय कार्यालयाकडून आदेश येईल तेव्हाच आम्ही हे काम थांबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घडणाऱ्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून प्रशांत पिसे यांनी जिल्ह्यातील संबंधित पत्रकारांना माहिती देवून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचेशी दुरध्वनीवर चर्चा केली मुख्य पोस्ट आॅफिस येथील पोस्टमास्तरला दुरध्वनीवर बोलून तात्काळ कार्यवाही करून बाहेर बोर्डावर सुचना लिहिण्यास सांगितले.
जिल्ह्यातील तालुका, शहर व गावपातळीवर असलेल्या पोस्ट आॅफिसला आदेश देवून बेटी बचाव बेटी पढाव या 'फेक' योजनेला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी दुपारी १२ वाजता पासून पवनी येथील पोस्ट आॅफिसमध्ये बेटी बचाव बेटी पढाव या 'फेक' योजनेचे दिल्ली करिता नोंदणीकृत डाक घेणे पोस्ट कार्यालयाने थांबविल्यामुळे अनेक गोरगरीबांचा आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा बनावट योजनेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.