कोरोनाला वाकुल्या दाखवत ग्रामीण भागातही अनेकांनी उडविला लग्नाचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:56+5:302021-04-21T04:34:56+5:30
भंडारा : गत वर्षभरापासून कोरोना संसर्गाचे संकट कायम असून अनेकांचे लग्न सोहळे कोरोनामुळे थांबले होते. मात्र, अद्यापही कोरोना ...
भंडारा : गत वर्षभरापासून कोरोना संसर्गाचे संकट कायम असून अनेकांचे लग्न सोहळे कोरोनामुळे थांबले होते. मात्र, अद्यापही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेकांच्या संयमाचा बांध फुटल्याने कोरोनाला वाकुल्या दाखवत निवडक जणांच्या उपस्थितीत का असेना अनेकांनी लग्नाचा बार उडवला आहे.
लग्न सराई, सामुदायिक विवाह सोहळे अशा विविध कार्यक्रमांवर मर्यादा आल्या असल्या तरी पंचवीस जणांच्या उपस्थितीच्या निर्णयानुसार अनेक जण ग्रामीण भागात आजही लग्न सोहळे उरकत आहेत. मात्र, अनेक जण लग्न सोहळ्यासाठी शासनाची परवानगी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे सर्वांचीच जीवन पद्धतीच बदलून गेली आहे. त्यामुळे साहजिकच याचा परिणाम लग्न समारंभावरही दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता लग्नसोहळ्यासाठी पोलीस, तहसील, नगर परिषद प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडता येणार असल्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने लग्न सोहळ्याचे प्रमाणही आता तसे कमीच झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात ठरलेले लग्न सोहळे उरकले जात आहेत. मात्र, रीतसर परवानगी घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाकडे नेमका नोंदीचा आकडा मिळणे कठीण झाले आहे. भंडारा जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन ते चार हजारांपेक्षा अधिक लग्नसोहळे उरकले जातात. मात्र, यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक जणांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवरा अथवा नवरी मुलीकडचे लग्नाला वीस जणांपेक्षा जास्त कोणी येता कामा नये तरच आमची लग्नाला परवानगी असल्याचे सांगत आहेत. ग्रामीण भागात मध्यंतरी अनेक जण नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, अलीकडे महिनाभरात कोरोना रुग्णांच्या मृतांचा दिवसेंदिवस आकडा वाढत असल्याने अनेकजण गंभीर झाले आहेत. काही जण दारासमोरच तर काहीजण मंगल कार्यालय भाड्याने घेत आहेत.
बॉक्स
यंदा विवाहाचे ५३ मुहूर्त
यावर्षी विवाह समारंभासाठी ५३ मुहूर्त आहेत. १९ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत यंदा लग्नाच्या तारखा तशा कमीच आहेत. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने लग्नाचा धूमधडाका सुरू होतो. मात्र, कोरोना संसर्गामुळे अनेकांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत एकूण ५३ शुभमुहूर्त आहेत. यात एप्रिल ७ मे महिन्यात १५ जून आणि जुलै महिन्यात चार तारखेचा आहेत. नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत लग्नाचे २९ मुहूर्त आहेत. त्यामुळे मे महिन्यात कोरोना असतानाही किती जण लग्नाचा बार उडवतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.
बॉक्स
एप्रिल-मेमध्ये कठीणच
यावर्षीही कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने अनेकांना लग्न करताना भीती वाटत आहे, तर दुसरीकडे ३० एप्रिलपर्यंत शासनाने संचारबंदी लागू केली असल्याने एप्रिल महिन्यात लग्न करणे कठीण होत आहे. त्यामुळे मे महिन्यात असणाऱ्या सर्वाधिक १५ तिथींचा विचार केल्यास कोरोना संकट कधी संपते, यावरच आता पुढील परिस्थिती ठरणार आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात विवाह नोंदणीकडे होतेय दुर्लक्ष
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असल्याने शासनाने लग्न सोहळ्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यातच कोरोना मृतांचा आकडा वाढत चालला असल्याने अनेकांचे ठरलेले विवाह रद्द होत आहेत. तर कार्यालयात नोंदणी केल्यास शासनाचे नको ती कटकट मागे लागेल यासाठी ग्रामीण भागात अनेकजण विवाह नोंदणीकडे टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, असे असले तरीही काही नवरदेव अथवा नवरी मंडळीकडील वडीलधारी मंडळी विवाह ठरवतानाच २० पेक्षा अधिक कोणीही येणार नाही, अशी खात्री देत असाल तरच आम्ही लग्नाला तयार आहोत, असे सांगत आहेत.
कोट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचे संकट मोठे आहे. मध्यंतरी रुग्णांची संख्या घटल्याने लग्न सोहळ्याला चांगली सुरुवात झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढल्याने अनेकांनी लग्न सोहळ्यासाठी केलेल्या बुकिंगही रद्द केल्या आहेत. यामुळे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान होत आहे.
विकी गिरीपुंजे, स्वीट अँड लव्ह सेलिब्रेशन, खरबी नाका.
कोट
कोरोना संकटामुळे अनेक मंगल कार्यालय चालकांचे नियोजनाचे कोलमडले आहे. यंदाच्या हंगामातील पूर्ण उलाढालच ठप्प झाली आहे. मार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्यात कोरोना मृतांचा आकडा वाढल्याने अनेकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्या आहेत, तर दुसरीकडे मंगल कार्यालय चालकांना नोकरांचे पगार, देखभालीचा खर्च, बँकांचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.
शासनाने यातून मार्ग काढून मंगल कार्यालय चालकांना दिलासा दिला पाहिजे.
हेमंत सेलिब्रेशन, भंडारा