जिल्ह्यात वर्ग १ व २ ची अनेक पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:31 AM2017-07-19T00:31:23+5:302017-07-19T00:31:23+5:30
भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात वर्ग एक आणि वर्ग दोनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, ....
परिणय फुके यांचा सचिवांकडे पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात वर्ग एक आणि वर्ग दोनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.
भंडारा जिल्ह्यात महसुल आणि पंचायत प्रशासनातील विविध शासकीय कार्यालयात शंभराहून अधिक वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले. त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही पदे भरण्याबाबत संबंधित विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.
त्या पत्राच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दीपक मोरे यांनी भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांपैकी आपल्या विभागाच्या अधिनस्थ रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी, असे पत्र ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, महसूल, वने, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, नगरविकास, जलसंपदा विभागाच्या उपसचिवांना दिले आहे.
याशिवाय अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राची दखल घेत पाठविलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील वर्ग एक व वर्ग दोनची रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिले आहे., या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदे लवकरच भरण्यात येतील, असा विश्वास आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.