दंडाच्या भीतीने अनेकांनी काढले कुलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:00 AM2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:35+5:30
सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घरात थंडावा आल्याने बाहेर फिरणारे दिवसा घराच्या आत राहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : घराबाहेर कुलर लावण्यास नगरपरिषदेतर्फे दंड वसूल करण्यात येईल, अशी अफवा शहरात पसरल्याने साकोलीतील नागरिकांनी आपआपल्या घरात लावलेले कुलर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही अफवा असून कुणीही कुलर काढू नये, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केल्याने धास्तावलेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घरात थंडावा आल्याने बाहेर फिरणारे दिवसा घराच्या आत राहत आहे. याच काळात नगरपरिषदेतर्फे गावात कचरा फेकणारे, नाली बुजविणारे, अनावश्यक फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, परवाना न घेता दुकान, व्यापार करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. परंतु, नागरिकांनी घराबाहेर लावलेले कुलर लवकरात लवकर काढून टाकावे अन्यथा नगरपरिषदेकडून कुलर जप्त करण्यात येईल व दोन ते पाच हजारपर्यंत दंड करण्यात येईल, अशी अफवा शहरात पसरली. या अफवेमुळे नागरिकांनी बाहेर लावलेले कुलर घराच्या आत लावण्यास सुरुवात केली.
बाहेर लावलेल्या कुलरसंबंधात विविध प्रकारच्या अफवेमुळे नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी कोंडीत सापडले आहेत. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे नाव सांगून जे लोक बाहेर कुलर लावतील त्यांचे कुलर जप्त करून दंड वसूल करण्यात येईल. काही लोकांचे मुख्याधिकाऱ्यांनी कुलर जप्त केले व काही लोकांकडून दंड घेतला तर काहींवर गुन्हे दाखल केले, अशा अफवांना पेव फुटले आहे.
अशा अफवा पसरल्याने नागरिक धास्तावले असून दंडापोटी बऱ्याच लोकांनी आपले कुलर बाहेरून काढून घराच्या आत लावले. याबाबत मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याशी चर्चा केली असता कुणीही अफवेवर विश्वास ठेऊ नये, कुलर बाहेर लावण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणतेही आक्षेप नाही व परवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, कुठलीही माहिती नगरपरिषदेत स्वत:येऊन किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे, असे सांगितले. अलीकडे साकोलीत विविध प्रकारचे दुकाने उघडणार असल्याच्या अफवा आहेत.
काही समाजकंटक संचारबंदीचा फायदा घेत माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.
- माधुरी मडावी,
मुख्याधिकारी नगरपरिषद, साकोली.