‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:18+5:30
महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल,........
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल, अशी घोषणा आशा कर्मचाऱ्यांच्या मोर्च्यासमोर युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर यांनी केली.
मोर्च्याचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा संघटक राजू बडोले व जिल्हा सचिव सुनंदा दहिवले यांनी केले.
आशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनाच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, शासकीय सेवेत सहभागी करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचारी संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमपणे राबविण्यात यावे, प्रोमोटर्सच्या मोबदल्याचे प्रलंबित बिल द्या, स्टेशनरी पुरवा व विविध कागदपत्राच्या झेरॉक्सचे बिल द्या, ज्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही ते काम ‘आशा’ कडून करवून घेवू नये, जसे एपीएल, महिलांचे बाळंतपण, आयुष्यमान भारत योजना, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया वाटने, स्किनिंग करने आदी कामे या पुढे आशा कर्मचारी करणार नाही, प्रत्येक मिटींगचा ३०० रुपये भत्ता द्या, आशांना व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्याच्या सर्व सुविधा द्या, आशांना मानधन दिल्या जाणाºया बँकेतून कर्ज पुरवठ्याची सोय करा व गोवर रुबेला कामाचा मोबदला द्या आदी मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे देण्यात आले.
सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लतिका गरुड यांनी स्विकारले. त्यांनी स्थानिक मागण्या मान्य करुन मानधन वाढीच्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, हिवराज उके, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, आशिषा मेश्राम, साधना बडोले, सविता नारनवरे, डाकरे आदींचा समावेश होता.
शेवटी शिवकुमार गणवीर यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली तर हिवराज उके यांनी समारोप केला. वामनराव चांदेवार, राजू बडोले व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठया संख्येत जिल्ह्यातील आशा कर्मचारी मोर्च्यात प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या.