बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात राष्ट्रवादी व भाजपा समर्थित महाआघाडीने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 07:32 PM2023-05-22T19:32:56+5:302023-05-22T19:33:21+5:30
Bhandara News भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट समर्थीत महाआघाडीने काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडीत सत्ता मिळविली. सभापतीपदी भाजपाचे विवेक नखाते तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते विजयी झाले.
भंडारा : सोमवारला झालेल्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट समर्थीत महाआघाडीने काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडीत सत्ता मिळविली. सभापतीपदी भाजपाचे विवेक नखाते तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते विजयी झाले. बंडखोरी करीत विवेक नखाते यांनी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद मिळविल्याने काँग्रेस गोटात निराशेचे वातावरण पहावयास मिळाले.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने १८ पैकी सर्वाधिक ९ जागा जिंकल्या होत्या.
महाआघाडीने ६ जागा तर अपक्षांनी तीन जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर तिन्ही अपक्षांनी महाआघाडीला समर्थन दिल्याने ९ विरूद्ध ९ असे संख्याबळ झाले होते. बहुमतासाठी दोन्ही गटाला एका संचालकाची गरज होती. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याचे संकेत सुरूवातीपासून होते. परंतु निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी काँग्रेसच्या गटातील विवेक नखाते यांनी सभापतीपदासाठी बंडखोरी करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे स्वप्न् धुळीस मिळाले. निवडणूक निकालातही तेच चित्र दिसून आले.
बाजार समितीच्या सभागृहात सभापती पदासाठी काँग्रेसचे रामलाल चौधरी यांनी अर्ज भरला. त्यांचे सूचक रमन नरडंगे तर अनुमोदक सुखराम अतकरी होते. भाजप गटातून सभापती पदासाठी विवेक नखाते यांचे अर्जाला सूचक जयराम वंजारी तर अनुमोदक हितेश सेलोकर होेते. निवडणुकीत विवेक नखाते यांना १० मते तर रामलाल चौधरी यांना ८ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी काॅग्रेस गटातून नितीन कडव यांचे अर्जाला सूचक पुष्पमाला मस्के तर अनुमोदक कृष्णा अतकरी होेते. महाआघाडीतून उपसभापतीपदासाठी नामदेव निंबार्ते यांचे अर्जाला सूचक नरेंद्र झंझाड तर अनुमोदक विजय लिचडे होते. नामदेव निंबार्ते यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. निवडणुकीनंतर गुलालाची उधळण करीत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक तथा प्राधिकृत अधिकारी शुद्धोधन कांबळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. त्यांना मुख्य लिपीक निलेश जिभकाटे व कृषी बाजार समितीचे सचीव सागर सार्वे यांनी सहकार्य केलेे.