बाजारपेठ पडली ओस
By admin | Published: November 15, 2016 12:24 AM2016-11-15T00:24:43+5:302016-11-15T00:24:43+5:30
देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे.
नोटा बंदचा फटका : बँकासह एटीएमही बंद
भंडारा : देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे. आज गुरुनानक जयंती असल्याने बँक बंद होत्या. त्यामुळे बँक व एटीएममधूनही पैसे उपलब्ध झाले नसल्याने नागरिकांची परिस्थिती कोंडीत सापडल्यागत झाली. बँक बंद असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. भंडारा शहरातील बाजारपेठेत सोमवारला शुकशुकाट दिसून आला.
दिवाळीनंतरही बाजारपेठेत खरेदीदारांची रेलचेल होती. मात्र चलनी नोटा बंद झाल्याने याचा विपरित परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. सोमवारला बँक बंद असल्यामुळे सदर प्रतिनिधीने शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारला असता शुकशुकाट दिसून आला. लाखो रूपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेतील ‘गल्ला’ अर्ध्यापेक्षाही कमीवर आला होता.
८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांकडे पैसा असूनही त्याचा वापर बंद झाला. पैशाचा विनियोग करता यावा, यासाठी शासनाने मुदत दिली आहे. चलनी नोटा बंद केल्याने नागरिकांना २००० रूपयांची व १०० रूपयांचा नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या नोटांचा तुटवडा भरून निघालेला नाही. बँकामध्ये पैशांची अदलाबदल करून मिळत असले तरी हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शनिवार व रविवारला सुटीच्या दिवशी बँकीग व्यवहार सुरू ठेवले होते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात पैसे उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांची ओरड सुरुच आहे. (शहर प्रतिनिधी)
पैशासाठी नागरिकांची वणवण
बँक व एटीएम केंद्रातून मोजकी रक्कम मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहे. सोमवारला बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहार कोलमडला. काही एटीएम केंद्रातून पैसे मिळत असल्याची माहिती होताच अनेकांनी केंद्र गाठले. मात्र तिथे पोहचेपर्यंत तेथील रक्कम संपल्यामुळे अनेकांना निराश होऊन परतावे लागले. स्टेट बँकेच्या मिस्कीनटँक शाखेतील एटीएममधून पैसा मिळत असल्याने नागरिकांची रांग लागली होती.
आर्थिक अर्धांगवायुचा झटका
सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असला तरी गुरुनानक जयंतीमुळे बँका बंद होत्या. अगोदरच पैशाची चणचण असताना बँक व एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांना जणू ‘आर्थिक अर्धांगवायू’ चा झटका बसल्याची परिस्थिती उद्भवली. आज बँका बंद असल्या तरी अनेकांना याची कल्पना नसल्याने त्यांनी सकाळीच बँक गाठली. कित्येकजण लवकर नंबर लागावा या हेतूने रांगेत उभेही झाले. बँकेचा वेळ निघून गेल्यावरही बँक सुरु न झाल्यामुळे आज बँक बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना आल्यापावली परतावे लागले.