साकोलीत स्थानांतरित जागेवरील बाजारात समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:40 AM2019-05-20T00:40:22+5:302019-05-20T00:40:49+5:30
साकोलीचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, याकरिता पटाच्या दाणीवर स्थानांतरीत करण्यात आला. नगरपालिकेच्या सदोष नियोजनाचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागत आहे.
शिवशंकर बावनकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोलीचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, याकरिता पटाच्या दाणीवर स्थानांतरीत करण्यात आला. नगरपालिकेच्या सदोष नियोजनाचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागत आहे.
साकोलीच्या आठवडी बाजाराच्या स्थानांतरीत करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून सतत होत होती. आठवडी बाजाराच्या दिवशी काही अपघात सुद्धा झाले. तत्कालीन स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली नाही. पटाच्या दाणीवर रविवारचा आठवडी बाजार स्थानांतरीत करण्यात आला. तेथे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, दुकानदाराला बसण्याकरिता ओटे व विद्युत याची व्यवस्था करण्यात आली नाही. जवळच मालगुजारी तलाव आहे. काही दिवसात पावसाळा सुरुवात झाली तर याचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागणार आहे.
साकोलीत रविवारचा आठवडी बाजार २५ ते ३० किमी परिसरातील भाजीपाला उत्पादक, शेतकरी, चिल्लर विविध वस्तू विकणारे विक्रेता येथे हजारोच्या संख्येत येतात. खरेदी करणाऱ्यांची संख्या पाच ते दहा हजारापर्यंत आहे. साकोली तालुक्याचा अत्यंत महत्वपूर्ण आठवडी बाजार आहे. आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे बाजारात विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे. साकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रविवारी सर्व्हीस रोडवर साकोली तहसील (जुनी) ते बसस्थानक, गडकुंभली व एकोडी रस्त्यावर आठवडी बाजार भरत होता. अपघात होण्याची शक्यता नेहमीच होती. ट्राफीक जाम सुद्धा होत होते. यामुळे घाईगर्दीत आठवडी बाजाराचे स्थानांतरण करण्यात आले.
सध्या आचारसंहिता सुरु असल्यामुळे आठवडी बाजारातील आवश्यक कामे करता येणार नाही. आचारसंहिता संपताच आठवडी बाजारात आवश्यक सुविधा करण्याचे नियोजित आहे. शासनाकडे आठवडी बाजाराकरिता ३५ कोटीची मागणी केली आहे.
-धनवंता राऊत,
नगराध्यक्ष, नगरपरिषद, साकोली.