महिलांच्या उत्पादनांना ‘स्वयंसिद्धा’तून मिळाली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:37 PM2018-02-24T22:37:19+5:302018-02-24T22:37:19+5:30
पूर्व विदर्भातील महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या गावाकडच्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ स्वयंसिद्धाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते झाले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पूर्व विदर्भातील महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या गावाकडच्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ स्वयंसिद्धाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते झाले. महिलांनी तयार केलेल्या व महिलांच्याच माध्यमातून विक्री व्यवस्था असलेल्या या स्वयंसिद्धा प्रदर्शनात पूर्व विदर्भातील सुमारे ३५० महिला सहभागी झाल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांनी नागपूर येथे आयोजित केले आहे.
दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात या समुहातून स्वयंसिद्धा २०१८ या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अनूपकुमार उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद भंडाºयाचे शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, वर्धेचे अजय गुल्हाने, चंद्रपूरचे जितेंद्र पापळकर, गडचिरोलीचे शंतनू गोयल, गोंदियाचे डॉ. राजा दयानिधी, स्वयंसिद्धाचे संयोजक, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे उपस्थित होते.
‘बचत’ ही महिला सक्षमीकरणाचा मुलाधार आहे. महिलांची बचत करण्याची वैयक्तीक सवय त्यांना समुहाशी आणि पर्यायाने उत्पादनाशी जोडते. ही बाब लक्षात घेता महिलांनी सक्षमतेने बचत गटाच्या चळवळीत सहभागी होऊन उत्पादन निर्मितीसोबतच उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता त्याच्या पैकेजींगवर भर दिला पाहिजे. जितकी आकर्षक पैकींग तितका ग्राहकांचा प्रतिसादाने बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत मिळते. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महिलांच्या श्रमाला खºया अर्थाने श्रमाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता प्रयत्न करावे. येणाºया काळात विभागातील प्रत्येक जिल्ह्यात वर्धेप्रमाणे रुरल मॉलची संकल्पना साकार करण्यात येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.
स्वयंसिद्धा हे दर्शनिक स्वरुप आहे. ज्याद्वारे महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून अधिकाधिक महिला बचत गट स्वयंसिध्दा प्रदर्शनीकडे आकर्षित होतील. येणाºया काळात प्रदर्शनिचे स्वरूप अधिक भव्य होईल. अशी अपेक्षाही भंडाºयाचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.
चार वर्षापासून पूर्व विदर्भाकरिता स्वयंसिद्धाची संकल्पना सुरु करून प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनीच्या माध्यमातून खवैय्ये तसेच भ्रमंती करणाºयांना एका छताखाली विविध वस्तू व कलाकृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेत २७ फेब्रुवारीपर्यत चालणाऱ्या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन संयोजक व भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक भाषणातून केले.
संचालन मुकुंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी केले. आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाऱ्याच्या प्रकल्प संचालक मंजूषा ठवकर यांनी मानले. यावेळी अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रदर्शनीच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांच्या उपस्थितीने प्रदर्शनीतील महिला बचत गटांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
विविध स्टॉलची मेजवानी
या प्रदर्शनामध्ये खाऊ मंडई, भूसार मंडई, सुग्रणीचा संसार, कलादालन, वनभ्रमंती असे पाच विभाग असून यामध्ये ४५ स्टॉल पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील सुग्रणींनी केलेल्या खाद्यपदार्थांचे आहेत. यापैकी भंडारा जिल्ह्यातील विविध कलाकुसर शेंद्रीय तांदूळ, रेशीम साड्या, बांबू हस्तकला, लाकडी हस्तकला वस्तू, पितळी व मातीची भांडी यांचेही प्रदर्शनीमध्ये स्टॉल उपलब्ध आहेत. याशिवाय खाऊ मंडई मध्ये मांडे, पुरणपोळी, भाकरी, शाकाहारी, मांसाहारी जेवण आदी रुचकर साहित्याचे स्टॉलच्या माध्यमातून स्वयंसिद्धा आपल्या रुचकर व ग्रामीण पाककलेच्या कलाकृती उपलब्ध करून देत आहेत.
चार दिवसीय प्रदर्शनी
राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिद्धा प्रदर्शनी दिनांक २७ फेब्रुवारीपर्यत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यत सर्वांना विनामुल्य असून महिलांनी तयार केलेल्या वस्तु व विविध ग्रामीण खाद्यपदार्थांच्या दालनाला जनतेने मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.