बडेजावाला फाटा देत साध्या पद्धतीने विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:36 PM2019-07-16T23:36:08+5:302019-07-16T23:36:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लग्न म्हटले की, बडेजाव आलाच. आपली प्रतिष्ठा लग्न सोहळ्यातून दाखविण्याची चढाओढ लागलेली असते. कर्जबाजारी ...

Marriage is a simple way of marrying Badejawala | बडेजावाला फाटा देत साध्या पद्धतीने विवाह

बडेजावाला फाटा देत साध्या पद्धतीने विवाह

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टर जोडप्याचा आदर्श : स्वागत समारंभाच्या खर्चातून उभारणार ग्रंथालय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लग्न म्हटले की, बडेजाव आलाच. आपली प्रतिष्ठा लग्न सोहळ्यातून दाखविण्याची चढाओढ लागलेली असते. कर्जबाजारी होऊ परंतु लग्न धूमधडाक्यात करू अशी मानसिकता सर्वत्र दिसते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत एका डॉक्टर जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने ते ही नोंदणी विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवला. डॉ. प्रताप अर्जून गोंदुळे आणि डॉ. रोशनी सुधाकर राऊत असे या डॉक्टर दांपत्याचे नाव आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील डॉ.प्रताप मुंबई येथे बालरोग तज्ज्ञ आहे. एमबीबीएस बीसीएस झालेल्या डॉ.प्रताप यांची नाळ आजही गावाशी जुळली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात नोकरी करीत असताना आणि उच्च शिक्षित असतानाही त्यांनी रूढी परंपरा आणि रितीरिवाजांना बाजूला सारत नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांना साथ दिली ती त्यांची अर्धांगिनी डॉ.रोशनी यांनी. रोशनी या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील सुधाकर राऊत यांची कन्या. बीएएमएस एमडी असलेल्या रोशनी यांनी डॉ.प्रताप यांच्या विचाराला उचलून धरले आणि तीही अगदी साध्या पद्धतीने विवाह करण्यास तयार झाली. सोमवार १५ जुलै रोजी भंडारा येथील नोंदणी कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.
लग्नानंतर स्वागत समारंभ करावा अशी कुटुंबियांची इच्छा होती. परंतु लग्नावर खर्च टाळला आता स्वागत समारंभ कशाला असे म्हणत डॉ.प्रताप यांनी कुटुंबियांची समजूत काढली. स्वागत समारंभासाठी होणाऱ्या पैशातून गावात ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला. येथेही डॉक्टरांचा सेवाभाव दिसून आला. विशेष म्हणजे लग्नाच्या पत्रिकेतूनही त्यांनी सामाजिक प्रबोधन केले. बेटी बचाव चा संदेश देणारा लोगो आणि स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश त्यांनी आपल्या साध्या पत्रिकेतून दिला. देव-देवतांच्या फोटोऐवजी त्यांनी वृक्षाचे फोटो आणि स्वच्छ भारत मिशनचा गांधीजींचा चष्मा त्यावर मुद्रित केला. असा हा आगळा वेगळा सोहळा भंडारा जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय आहे. या सोहळ्यातून अनेकांनी आदर्श घ्यावा आणि विवाहावर होणारा अनावश्यक खर्च टाळावा, अशी अपेक्षा आहे.
अवाजवी खर्च करून काही साध्य होत नाही
नोंदणी पद्धतीने विवाह आटोपल्यानंतर डॉ.प्रताप गोंदुळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, निरर्थक आणि अवाजवी खर्च लग्नावर करून काहीच साध्य होत नाही. मी ज्या परिस्थितीत त्याची मला जाणीव आहे. समाजाला काहीतरी आपले देणे लागते. या भावनेतून स्वागत समारंभाच्या सोहळ्यातून आपण ग्रंथालय उभारणार आहे. त्या ठिकाणी जाऊन चार मुले मोठी झाली तर हीच देशाची खरी संपत्ती आहे. प्रतिष्ठेपेक्षा समाजहिताला प्रत्येकाने महत्व दिले तर देश निश्चितच प्रगतीचे पाऊल टाकेल यात शंका नाही, असे डॉ.प्रताप म्हणाले.

Web Title: Marriage is a simple way of marrying Badejawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.