विवाहितेच्या खुनाचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:29 PM2019-02-27T22:29:03+5:302019-02-27T22:29:51+5:30
घरी एकट्या असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वॉर्डात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. या खुनाचे गुढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : घरी एकट्या असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वॉर्डात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. या खुनाचे गुढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ज्योत्स्ना गणेश जुमळे (३०) रा.बेलघाट वॉर्ड पवनी असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पती गणेश रामदास जुमळे आपल्या घरी परत गेला तेव्हा पत्नी मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून झाल्याचे लक्षात आले. रात्रीच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान बुधवारी ज्योत्स्नाचा भाऊ गोकुळदास काटेखाये (४३) रा.खातखेडा यांनी या प्रकरणी संशय व्यक्त करीत तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी पती गणेश रामदास जुमळे (३५), उमेश रामदास जुमळे (३०), मंगेश रामदास जुमळे (२८), चिंधाबाई रामदास जुमळे (५५) आणि रामदास जुमळे (६०) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान खुनाचे गुढ कायम असून नेमका खून कशासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेने पवनी शहरात खळबळ उडाली असून रात्री बेलघाटा वॉर्डात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
नागपुरात उत्तरीय तपासणी
ज्योत्स्ना जुमळे हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पवनी येथे करण्यास नातेवाईकांनी मनाई केली. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करावे अशी मागणी केली. त्यावरून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.
पवनीच्या तरुणाची विहिरगावात शस्त्राने हत्या
पवनी येथील प्रसिद्ध ग्राफीक्स डिझायनरची नागपूर जिल्ह्यातील विहिरगाव येथे धारदार शस्त्राने हत्या करण्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. संजय धनराज चव्हाण (३५) असे मृताचे नाव आहे. तो गत काही वर्षांपासून डिझायनिंगच्या कामानिमित्ताने नागपूर जिल्ह्यातील विहिरगाव येथे आपल्या पत्नी व मुलासह राहत होता. मंगळवारी रात्री तो राहत असलेल्या फ्लॅटवर त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या संदर्भात नागपूर पोलिसांनी एका संशयीत इसमाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. दरम्यान दुपारी शवविच्छेदनानंतर संजयचे पार्थिव पवनी येथे आणण्यात आले. चव्हाण कुटुंबिय पवनी येथील तुकडोजी वॉर्डात वास्तव्यास आहेत. संजय चव्हाण यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील असा आप्तपरिवार आहे. २४ तासात घडलेल्या खुनाच्या दोन प्रकरणाने पवनी शहर हादरून गेले आहे. शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या पवनी शहराला कुणाचे ग्रहण लागले अशी चर्चाही होऊ लागली आहे. संजयच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र कळू शकले नाही.