विरली येथे बटाटा लागवडीचा सामूहिक प्रयोग

By admin | Published: April 6, 2016 12:33 AM2016-04-06T00:33:03+5:302016-04-06T00:33:03+5:30

धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता सामूहिक शेतीच्या प्रयोगासोबतच

Massive experimentation of potato cultivation at Virali | विरली येथे बटाटा लागवडीचा सामूहिक प्रयोग

विरली येथे बटाटा लागवडीचा सामूहिक प्रयोग

Next

लोकमत शुभवर्तमान : शेतकऱ्यांनी स्थापन केली कंपनी, यशोगाथा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची
भंडारा : धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता  सामूहिक शेतीच्या प्रयोगासोबतच वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करीत उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली खंदार येथील नामदेव लांजेवार या शेतकऱ्याने  पुढाकार घेत गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन सामूहिक बटाटा लागवडीच्या माध्यमातून  वेगळा पायंडा पाडला आहे.  
भंडारा जिल्ह्यात १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात येते. मात्र खरीप पिकानंतर रब्बी पिक घेण्याचे प्रमाण येथे केवळ २० टक्के आहे. शेतकऱ्यांमध्ये  रबी पिक घेण्याविषयी कृषी विभाग आणि ‘आत्मा’च्यावतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित कारण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे नामदेव लांजेवार यांनी पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना सोबत घेऊन सप्तरंगी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली.
याच कंपनीतील विरली खंदार येथील  40 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रबी हंगामात ४२ एकरावर बटाटयाची सामूहिक धान निघाल्यावर लगेच नोव्हेंबर महिन्यात चिप्सोना प्रजातीच्या बटाटयाची २६ बाय ६ इंचावर लागवड केली. यासाठी  सामूहिक बियाणे खरेदी केले. चिप्सोना जातीचे बियाणे पंजाबहून मागविण्यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे यांनी  सहकार्य केले. खत आणि औषधांचीसुद्धा सामूहिक खरेदी करुन पिकांची जोपासना केली. बटाटे हे पिक तीन महिन्यातच येते.  त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसा मिळतो. माल विक्रीसाठी  सप्तरंगी कंपनीने पुणे येथील खाजगी कंपनिशी करार केला. 
कंपनीने माल शेतातूनच उचल केल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यासाठीचा वाहतूक आणि आडत खर्च वाचला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही कंपनीने दिले.   यासाठी शेतकऱ्यांना एकरी ३५ ते ४० हजार खर्च आला असून एकरी १० टन उत्पादन निघाले.  ७ रुपये किलो प्रमाणे दर मिळाल्याने  एकरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना एकरी ३० ते ४० हजार नफा झाला आहे. विरली खंदार येथील शेतकऱ्यांचा सामूहिक शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Massive experimentation of potato cultivation at Virali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.