घरकुल निधीसाठी लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष, नगरसेवक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:35 AM2021-03-26T04:35:52+5:302021-03-26T04:35:52+5:30
तुमसर: नगर परिषद तुमसर येथे सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६४ घरकुलांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. ...
तुमसर: नगर परिषद तुमसर येथे सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६४ घरकुलांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाला सुरुवातही केली; मात्र केंद्र शासनाकडून त्या घरकुलाकरिता एक दमडी नसल्याने तुमसर शहरातील ३६४ घरकुल बांधकाम अडले असून, लाभार्थी उघड्यावर पडले आहेत. शासनाने तत्काळ दखल घेत घरकुलाची निधी द्यावा, यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर संपूर्ण ३६४ लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष व नगरसेवक रस्त्यावर उतरून एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
पाच दिवसांत घरकुलाचा निधी पालिकेला जमा न झाल्यास जिल्हा कचेरीवर संपूर्ण लाभार्थ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. तुमसर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा गाजावाजा करीत सन २०१७ मध्ये शहरातील अडीच हजाराच्याहीवर लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जाची छानणीनंतर १२९० अर्ज ग्राह्य धरून अर्जाच्या पडताडणीनंतर ३६४ लाभार्थ्यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून दीड लक्ष रुपये तर राज्य शासनाकडून एक लक्ष रुपये असे एकूण अडीच लक्ष रुपये लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता मिळणार होते. त्यानुसार राज्य शासनाने ७ डिसेंबर २०१८ ला ४० हजार रुपये व ४ जून २०१९ ला ४० हजार रुपये असे दोन हप्ते देऊ केले; मात्र केंद्र शासनाकडून दीड लाखांपैकी एक दमडीही न. प. ला मिळाला नाही. उलट साकोली, पवनी, भंडारा येथे केंद्राकडून घरकुलकरिता निधी प्राप्त झाले, यासाठी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेऊन अनेकदा शासन प्रशासनाला तक्रारीचे निवेदन दिले; मात्र एक दमडीही तुमसर नगर परिषदेला मिळाली नाही. परिणामी, घरकुल लाभार्थी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत असून, लाभार्थ्यांत न. प. प्रशासनाविरोधात असंतोष खदखदत आहे. प्रशासनाच्या चुकीची असह्य शिक्षा नगराध्यक्ष व नगरसेवकांना भोगावी लागत असल्याने लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सामूहिक आंदोलनाचे हत्यार उपसले असून, तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे देऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला. यावेळी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, गीता कोंडेवार, नगरसेवक सचिन बोपचे, मेहताबसिंह ठाकूर, अर्चना भुरे, शीला डोये, किरणदेवी जोशी,
अमरनाथ रगडे, विरोधी पक्षनेता, किशोर भवसागर, विद्या फुलेकर, छाया मलेवार, सुनील पारधी, रजनीश लांजेवार, पंकज बालपांडे, वर्षा लांजेवार, श्याम धुर्वे
कंचन कोडवानी, भारती धार्मिक, कैलास पडोळे, खुशलता भवसागर, तारा गभणे, नगरसेविका, राजू गायधने, प्रमोद घरडे, सलाम तुरक, नगरसेवक, राजेश ठाकूर, स्मिता बोरकर, घरकुल लाभार्थी व त्यांचे कटुंबीय उपस्थित होते.