शासनाचे तुटपुंजे मानधन तेही वेळेत मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:25 AM2021-02-19T04:25:10+5:302021-02-19T04:25:10+5:30
भंडारा : राज्यात सांस्कृतिक संचालनालयातर्फे साहित्यिक तसेच वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठ ...
भंडारा : राज्यात सांस्कृतिक संचालनालयातर्फे साहित्यिक तसेच वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांसह साहित्यात शासनाकडून उपेक्षितच असल्याचे दिसून येत आहे राज्य शासनाकडून दिले जाणारे हे मानधन जरी थेट डीबीटीद्वारे कलावंतांच्या बँक खात्यात जमा होत असले तरी हे मानधन नियमित जमा होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून कलावंतांचे मानधन शासनाने दिले नसल्याने कलावंतांमध्ये रोष व्यक्त होत आहे. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे शासनाचीही उदासीनता कारणीभूत ठरत आहे. ‘अ’ वर्गातील राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना २१०० रुपये मानधन दिले जाते. तर ‘ब’ वर्गातील राज्यस्तरावरील कलावंत साहित्यिकांना अठराशे रुपये मानधन तर ‘क’ वर्गातील जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिकांना महिन्याला पंधराशे रुपये मानधन दिले जाते. जिल्ह्यात ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील कलावंत साहित्यिक नसले तरी ‘क’ वर्गातील जवळपास साठजणांना हे अनुदान मिळते. मात्र, इतक्या अल्प प्रमाणात मिळणारे पंधराशे रुपयांचे मानधनही वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा खर्च देखील भागू शकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कलेच्या माध्यमातून जिल्ह्यातच नाही तर राज्यात नावलौकिक मिळविलेले झाडीपट्टीतील कलाकारांचे दीड हजार रुपयांचे मानधन वाढवून शासनाने किमान २० हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याची मागणी करत आहेत. वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांचे मानधन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे दिले जात होते. मात्र, आता शासनाने कलावंतांचे मानधन डीबीटीद्वारे सांस्कृतिक संचालनालयामार्फत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे अनुदान प्राप्त झालेले नाही विभागामार्फत शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अनुदान उपलब्ध होताच लाभार्थ्याच्या बँक खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल.
आशा कवाडे, समाजकल्याण अधिकारी,भंडारा
कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. ते तीन महिन्यांपासून अद्यापही मिळालेले नाही. कलावंत, साहित्यिक कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे. कोरोनानंतर कलाकारांना जगण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. शासनाने अडचणी सोडविण्याची गरज आहे.
भंडारा
सध्या दिले जाणारे साहित्यिक यांना मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. या मानधनात शासनाने भरीव वाढ करण्याची गरज आहे. आजही साहित्य व लोककलाकार सामाजिक एक प्रबोधनाचे काम करत आहेत त्यांना शासनाने प्राेत्साहन देण्याची गरज आहे.
नवोदित साहित्यिक गणेशपूर.
छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी लोककलेला,लोककलावंतांना खऱ्या अर्थाने आश्रय दिला.
मात्र त्याच पुरोगामी महाराष्ट्रात आज वृद्ध कलाकार व साहित्यिकांची होणारी परवड शासनाने लक्षात घेऊन मानधन वाढविण्याची गरज आहे.
कल्याणी निखाडे,लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या, ठाणा.