मग्रारोहयोच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:06+5:302021-02-05T08:43:06+5:30
६२ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यात दरवर्षी शासनाच्या मग्रारोहयोच्या अकुशल कामातंर्गत हजारो मजुरांना काम उपलब्ध केले जाते. सदर कामात ...
६२ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यात दरवर्षी शासनाच्या मग्रारोहयोच्या अकुशल कामातंर्गत हजारो मजुरांना काम उपलब्ध केले जाते. सदर कामात भातखचरे, नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण यासह अन्य मजुरी कामांचा समावेश आहे. सदर कामे करताना शासन नियमानुसार तालुक्यातील सर्वच यंत्रणांनी किमान ५० टक्के मजुरीची कामे उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत ग्रा. पं. यंत्रणा वगळता अन्य यंत्रणा या योजनेच्या अंमलबजावणीत उदासीन असल्याचा आरोप खुद्द प्रशासनातच केला जात आहे.
दरम्यान, यंदा तालुक्यात मग्रारोहयोच्या अकुशल कामातंर्गत ६२ ग्रामपंचायती क्षेत्रात १६६ भातखाचरे व एक नाला सरळीकरणाचे काम ग्रामपंचायतस्तरावर केले जाणार आहे. मात्र, सदर कामे केली जाणार असताना स्थानिक प्रशासन व रोजगारसेवकाच्या उदासीन धोरणामुळे मजुरांत आवश्यक जनजागृती केली न गेल्याने तालुक्यातील केवळ एकाच गावातील मजुरांनी कामाची मागणी केल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, यंदा तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिक मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात असल्याची ओरड असताना या योजनेंतर्गत मजुरीची कामे उपलब्ध केली जात नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवून मजुरांच्या कामाच्या मागणीदरात वाढ होण्यासाठी आवश्यक जनजागृती करून मजुरांकडून काम मागणीचे अर्ज दाखल करून घेण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.