धान शेतीसाठी यांत्रिकीकरण अत्याआवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:21+5:30
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्या शेतकऱ्यांना धान शेतीसाठी अधिक खर्च येत असल्याने धानाची शेती परवडेनासी झाली आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत धान शेती फायदेशीर होण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भातशेतीत यांत्रिकीकरण करणे आज काळाची गरज असून यांत्रिकीकरणाचा वापर शेतीत वाढल्यास धानशेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे मत भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, तंत्र अधिकारी आरे साहेब, गणेशपुर प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. संजय एकापूरे, खर्शीपार मुख्यालयाचे कृषी सहाय्यक आनंद मोहतूरे, यांच्यासह जाख परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी बोलताना कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणातून धान लागवड केल्यास बियाण्याची बचत होऊन आर्थिक तसेच वेळेची बचत झाल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होत असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. यावेळी यांत्रिकीकरण धान लागवडीची प्रात्यक्षिके दाखवली.
प्रोडूसर कंपनीचे संजय एकापुरे यांनी ऐन खरीप हंगमात मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच धान कापणीच्या वेळी ट्रॅक्टर सह मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी धान लागवड यांत्रिकीकरणाने करणार असल्याचे सांगितले.
कृषी विभागाच्या वतीने प्रोडूसर कंपनीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मिळत असलेल्या कृषि विभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी परिसरातील शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे भंडारा तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
मजुरांच्या समस्येवर करता येणार मात
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या तसेच पीक काढणीच्या वेळी मजुरांचा भासणारा तुटवडा यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाने धान लागवड केल्यास मजुरांच्या तुटवड्यावर मात करता येणार आहे. एकाच वेळी अनेक हेक्टर क्षेत्रावर रोवणी तसेच धानाची मशागत व धान कापणी करणे सहज शक्य असल्याने यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवड केल्यास शेतकऱ्यांना मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे . त्यामुळे हा आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जमा झाले होते.