मीडिया सेंटर ठरले नावापुरतेच
By admin | Published: July 7, 2015 12:39 AM2015-07-07T00:39:31+5:302015-07-07T00:39:31+5:30
जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज (सोमवार) मतमोजणीच्या दिवशी उभारण्यात आलेले ...
सुविधांचा अभाव : पोलीस कर्मचाऱ्यांचेही मानधन अडले
भंडारा : जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज (सोमवार) मतमोजणीच्या दिवशी उभारण्यात आलेले मिडिया सेंटर नावापुरतेच ठरले. माहिती देण्यासाठी माहिती कार्यालयासह निवडणुक विभागातील कर्मचारी उपस्थित नव्हते. नावापुरते उभारण्यात आलेल्या या सेंटरची चांगलीच चर्चा होती.
जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या पोलीस बहुउद्देशिय सभागृहात मतमोजणी करण्यात आली. यासाठी सभागृह परिसरात कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मिडिया व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था तोकडी होती.
निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकार तथा वार्ताहरांसाठी सभागृहाबाहेर असलेल्या मोकळया जागेत पेंडाल बांधण्यात आला होता. या पेंडालमध्ये सुविधांचा बोजवारा होता. २ टेबल, ६ खुर्च्या, ३ टेबल चादर व १ पंखा असे साहित्य असलेल्या ८ बाय १८ फुटांच्या या पेंडालमध्ये प्रसिद्धी माध्यमांना उपयोगी साहित्य उपलब्ध नव्हते. याशिवाय या सेंटरमध्ये निवडणुक विभाग तथा जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने वार्तांकन करताना पत्रकारांना असुविधा निर्माण झाली. अपडेट माहिती वेळेवर मिळण्यासाठी माहिती कार्यालयाने कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही.
निवडणूक मतमोजणीत सुरक्षा व्यवस्थेतंर्गत पोलीस मुख्यालय परिसरात जवळपास २०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र यापैकी फक्त १०० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची व्यवस्था असल्याचे कळते. तसेच निवडणुक कार्यात ‘रिर्झव्ह’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठलेही मानधन दिले जात नाही. अन्य कर्मचाऱ्यांना नियमानुसार मानधन मिळत असते. पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हा दुजाभाव असल्याची चर्चा आज ऐकावयास मिळाली. (प्रतिनिधी)