नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:44 AM2021-09-16T04:44:10+5:302021-09-16T04:44:10+5:30
तज्ज्ञ म्हणतात नीट हवीच : विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला फाटा फोडू नये भंडारा : तमीळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या २४ तासांपूर्वी एका ...
तज्ज्ञ म्हणतात नीट हवीच : विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला फाटा फोडू नये
भंडारा : तमीळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या २४ तासांपूर्वी एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्य सरकारने नीट न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील शिक्षणतज्ज्ञ मात्र सहमत नाहीत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला कधीही फाटा फोडू नये, अशी वैचारिक प्रतिक्रियाही या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नीट ही परीक्षा केंद्र पातळीवर होत असल्याने मेडिकल क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. विद्यार्थ्यांना या वर्षी परीक्षा न देता निकाल दिल्यामुळे बुद्धिकौशल्याची चाचपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. परिणामी महाराष्ट्र नीट न देता मेडिकलला प्रवेश द्यावा काय अशी चर्चा सुरु झाली आहे. याचा सरळ सरळ फटका बुद्धिवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना बसू शकतो. त्यांच्या बुद्धिकौशल्याला आयते कोलित देऊन त्यांच्यातील गुणांना विकसित न होऊ देण्याचा हा प्रयत्न राहील, असेही बोलले जात आहे.
काय आहे तमीळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?
n तमीळनाडू राज्याने केंद्राची नीट परीक्षा नको अशी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी मागणी केली होती. त्याचाच परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वी या राज्याने नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधायक तमीळनाडू विधानसभेत मांडून ते पारितही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्राची नीट परीक्षेची गरज नाही असाच या कायद्याचा सरळसरळ अर्थ काढला जात आहे. त्याच धर्तीवर अशीच मागणी अन्य राज्य सरकारही घेऊन विधेयक सादर करतील आणि अनेक राज्यांनी असा निर्णय घेतला तर केंद्रीय परीक्षांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असेही तज्ज्ञांना वाटत आहे.
धक्कादायक निर्णय
नीट परीक्षा ही केंद्रामार्फत घेण्यात येत असते. वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थीदशेतील अत्यंत महत्त्वपूर्ण टर्निंग पाॅइंट आहे. नीट परीक्षा झालीच पाहिजे, असे माझे प्रांजळ मत आहे. या वर्षी कोरोनामुळे बारावीची परीक्षाही झाली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याचे इत्थंभूत आकलन पूर्णपणे झाले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे नीट परीक्षा देऊनच बुद्धिवंतांनी वैद्यकीय क्षेत्रात गेले पाहिजे. मानसिक व शैक्षणिक पातळीवर विद्यार्थ्यांचे संतुलन व कलाकौशल्य परीक्षेतून समोर येत असते. त्यामुळे अशा परीक्षेला फाटा न फोडता त्या प्रामाणिकतेने घ्याव्यात असेच आमचे खरे मत आहे. तमीळनाडू राज्य सरकारचा निर्णय योग्य नाही.
-डाॅ.विकास ढोमणे, प्राचार्य जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा
तमीळनाडू सरकारने नीट परीक्षा न देण्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे असे आम्हाला वाटते. गुणवंत विद्यार्थी खऱ्या अर्थाने या परीक्षेची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. परीक्षाच होत नसेल तर बेसिक शिक्षणाचा पायाही कच्चा राहू शकतो. त्यामुळे अन्य राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आम्हा विद्यार्थ्यांना वाटत आहे.
-एक विद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनावर बुद्धिकौशल्याचा कस लावून गुण देण्यात आले. आरोग्यासारख्या विषयावर अवलंबून असलेल्या नीट परीक्षा व्हायलाच हवी, असे माझे प्रामाणिक मत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा कुठेही लाॅस होऊ नये याचीही खबरदारी प्रत्येक राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे. तमीळनाडू राज्य सरकारचा निर्णय चुकला असेच मला वाटते. नीट परीक्षा व्हायलाच हवी.
-अशोक पारधी,
कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक संघ विदर्भ.