मोहिमेसाठी वैद्यकीय संघटना सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:46 PM2018-09-25T21:46:44+5:302018-09-25T21:48:31+5:30
गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला असून या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेतली. भंडारा जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी वैद्यकीय संघटनांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला असून या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेतली. भंडारा जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी वैद्यकीय संघटनांनी केला.
आय.एम.ए. सभागृह भंडारा येथे भारतीय वैद्यकीय संघटना आणि भारतील बालरोग अकादमी यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उदघाटन आय.ए.पी. अध्यक्ष डॉ. अशोक ब्राम्हणकर, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. पुनम बावनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेला खाजगी डॉक्टर, आय.एम.ए. सदस्य, आय.ए.पी. सदस्य, प्रसुती विज्ञान व स्त्री विज्ञान सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
गोवर रुबेला लसीकरण शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटना आणि भारतीय बालरोग अकादमी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भंडारा जिल्हयातील सर्व बालरोग तज्ञांचे संपूर्ण सहकार्य लसीकरण मोहिमेसाठी मिळेल, असे डॉ. अशोक ब्राम्हणकर व डॉ. अशोक चौलेरा यांनी जाहिर केले. लसीकरणाचे लाभार्थी हे ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील असल्यामुळे बालरोग तज्ञाची महत्वाची भूमिका आहे.
गोवर रुबेला मोहिम नोव्हेंबर २०१८ मध्ये भंडारा जिल्हयामध्ये आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षापर्यंत वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यापैकी काही लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस दयावयाचा आहे. गोवर रुबेला मोहिम सर्व शासकीय शाळा, खाजगी शाळा, आश्रम शाळा, अंगणवाडी व उपकेंद्र स्तरावर राबविण्यात येणार आहे.
गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे जो मुख्यत: लहान मुलांना होतो व या आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो. रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक आजार जरी असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नवीन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष जसे अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय विकृती होऊ शकते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी प्रास्ताविकात गोवर-रुबेला ही मोहिम ही जिल्हयातील सर्व शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. डॉ. फुलचंद मेश्राम यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संगोपन अधिकारी माधूरी माथुरकर यांनी मानले.