औषधीयुक्त ‘जांभुळ’ झाड होतेय दुर्मिळ
By admin | Published: June 17, 2016 12:42 AM2016-06-17T00:42:46+5:302016-06-17T00:42:46+5:30
बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे.
आयुर्वेदात वृक्षाला मोठे महत्त्व : १०० वर्षांपेक्षा अधिक जगणारे झाड
लाखांदूर : बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, जांभुळ फळाचे दर्शनही दुर्मिळ होत आहे. जून महिना लागताच १०० रूपये किलो प्रमाणे ही फळे खरेदी करावी लागतात. जांभळाची फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.
मे व जून महिन्याच्या कालावधीत ‘डोंगराची काळी मैना’ म्हणून जांभुळाचे आगमन होते. जांभळात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या आजारात हे फळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्या रूग्णांसाठी ही फळे वरदानच ठरली आहेत. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. दररोज ४ ते ५ जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते.
या फळापासून वाईन, व्हीनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलिकडे सुरूवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभुळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे.
यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व पाणीरोधक असल्याने ते किमान १०० वर्षे टिकते. आता इमारती सिमेंटच्या असल्या तरी पूर्वी जांभुळ वृक्षाच्या राहत होत्या. बहुऔषधी, बहुपयोगी गुणधर्म जांभूळ झाडांसाठी अलिकडे कर्दनकाळ ठरला आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्ष लागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. (तालुका प्रतिनिधी)
औषधी गुणधर्मच ठरला कर्दनकाळ
जांभूळ या वृक्षाचा औषधी व बहुपयोगी गुणधर्मच त्या वृक्षासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसते. लाकूड व औषधासाठी वृक्षांची कटाई होते. पण जांभूळ वृक्षांची लागवड होताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातूनही हे वृक्ष दिसेनासे होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.