रंगकर्मी व कलावंतांच्या मागण्या पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:37+5:302021-07-31T04:35:37+5:30
भंडारा : रंगकर्मी कलावंतांच्या शिष्टमंडळातर्फे कलाकारांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. गत दोन वर्षांपासून देशात कोरोना महामारीने थैमान घातले ...
भंडारा : रंगकर्मी कलावंतांच्या शिष्टमंडळातर्फे कलाकारांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. गत दोन वर्षांपासून देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून यात सर्वांत जास्त फटका कलावंतांना बसला आहे.
कलावंतांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे त्यांची कला असते. कलाकार आपली कला जनतेसमोर प्रदर्शित करून मिळकत मिळवून आपले व आपल्या परिवाराचे पालन-पोषण करीत असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकारने कलावंतांच्या कला सादरीकरणावर बंदी घातली आहे. कलाकारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कलाक्षेत्रातील विविध कलाकार उपासमारीने त्रस्त आहेत. रंगकर्मी कलावंतांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवल्या आहेत. त्यापैकी एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किंवा मोजक्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तत्काळ परवानगी देणे, शाळेची फी न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. संबंधित शिक्षण विभाग व संस्थांशी तत्काळ बोलून हा प्रश्न निकाली काढावा, अटी-नियमांचे पालन करून रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्याची परवानगी द्यावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मी व कलावंत यांच्यासाठी रोजगार गॅरंटी योजना सुरू करावी, कोरोना काळ संपेपर्यंत कलाकारांना ५ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, महाराष्ट्रात विखुरलेल्या रंगकर्मी व कलावंतांची शासन दरबारी नोंद व्हावी, कलावंतांच्या पेन्शन अटीमध्ये शिथिलता आणून मानधनात वाढ करावी, म्हाडाच्या घरासाठी कलावंतांना सवलत देऊन काही घरे राखीव ठेवावीत, निराधार कलावंतांची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी, महाराष्ट्रातील सरकारी, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये कलाकारांकरिता राखीव बेड असावेत. रंगकर्मी व कलाकारांच्या अशा मागण्यांचे निवेदन रंगकर्मी कलावंतांच्या भंडारा शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे महेंद्र वाहाणे, अमर कला निकेतन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, एकता कलाकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वासनिक, डान्स ग्रुपचे संयोजक किशोर कुंभारे, लोकशाहीर अंबादासजी नागदेवे, ज्येष्ठ कलावंत आबीद शेख, नामांकित लोकशाहीर विठ्ठल तिरपुडे आदींचा समावेश होता.