मेगा ब्लॉकमुळे मेगा जाम
By admin | Published: July 19, 2015 12:38 AM2015-07-19T00:38:56+5:302015-07-19T00:38:56+5:30
तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वेने शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंत मेगा ब्लॉक केला.
स्लिपर बदलण्याची कामे : १२ तास रेल्वे फाटक बंदचा फटका
तुमसर : तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वेने शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंत मेगा ब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर सुमारे अडीच ते तीन किमीपर्यंत वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
रेल्वे ट्रॅकवरील स्लिपर बदलणे ही मुख्य कामे यावेळेत करण्यात आली. पुन्हा २९ जुलै रोजी डाऊन ट्रॅकवर मेगा ब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तुमसर रोड येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर एल. एम. ५३२ क्रमांकाचे रेल्वे फाटक आहे. या फाटकावर रेल्वे रुळ ओव्हर व्हॅलींग (वर) आले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक्टवरील सिमेंट स्लिपर बदलविण्याचा निर्णय घेतला. रायपूर विभागाने तसा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवार व शनिवारी अप लाईनवरील मेगा ब्लॉक होता. पुन्हा २९ जुलै रोजी डाऊन लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात येईल अशी माहिती आहे. १२ तासपर्यंत रेल्वे फाटक बंद होते. रेल्वे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी ही कामे रात्रभर केली. दरम्यान तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर वाहनांच्या दोन ते अडीच किलोमिटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. मेगा ब्लॉकमुळे वाहनचालकांनी रस्त्यावरच रात्रीचे भोजन तयार केले. पाऊस नसल्याने त्यांचे फावले. पाऊस असता तर मार्गावर अडलेल्या प्रवाशांची मोठी फजिती झाली असती. रेल्वे प्रशासनाने येथे दुसरा बायपास रस्ता तयार केला नसल्याने या मार्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)
उड्डाण पुलाचे कामे कासवगतीने
तुमसर रोड येथे उड्डाण पूल प्रस्तावित आहे. चार महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली. परंतु कामे कासवगतीने सुरु आहे. सध्या नालीवर बायपास रस्त्याची कामे सुरु आहेत. पावसाळा सुरु झाल्याने कामाचा वेग मंदावला आहे.दिवसातून या रेल्वे मार्गावर २२० मालवाहू व प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात. येथे प्रचंड वाहतूकीची कोंडी निर्माण होते. हा मार्ग प्रवाशांकरिता अत्यंत कमालीचा त्रासदायक ठरत आहे. आमदार तथा खासदारांनी राज्य व केंद्र शासनाकडून भरघोष निधी खेचून आणण्याची गरज आहे.