आज होणार पैशाचा ‘मेगाब्लॉक’
By admin | Published: November 14, 2016 12:29 AM2016-11-14T00:29:58+5:302016-11-14T00:29:58+5:30
चलनातील ५०० व १००० रूपयांचा नोटा बंद झाल्याने देशभरात सुटे पैशाची ‘त्सुनामी’ आली आहे.
गुरुनानक जयंतीनिमित्त बँकाना सुट्टी : नागरिकांची उडणार पैशासाठी त्रेधातिरपीट
प्रशांत देसाई भंडारा
चलनातील ५०० व १००० रूपयांचा नोटा बंद झाल्याने देशभरात सुटे पैशाची ‘त्सुनामी’ आली आहे. २००० रूपयांच्या नोटा चलनात आले असले तरी श्रमाचा पैसा वापरायला मिळणे दुर्लभ झाला आहे. अशा परिस्थितीत बँक किंवा एटीएममध्ये उभे राहून दोन ते चार हजार रूपये मिळत आहे. अशा स्थितीत उद्या गुरूनानक जयंती असल्यामुळे बँकींग व्यवहार बंद राहणार आहे. परिणामी जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहे. आजच्या ‘मेगाब्लॉक’चा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
देशात काळाबाजारी करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्थिक चलनातील ५०० व हजार रूपयांच्या नोटा अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आर्थिक व्यवहारात असलेल्या या नोटांना आता कवडीमोल किंमत उरली आहे. ज्या नागरिकांकडे या नोटा आहेत त्यांच्या विनियोग व्हावा यासाठी केंद्र सरकारने या नोटा चालविण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिला आहे. मागील चार दिवसांपासून नागरिकांची पैशांसाठी ससेहोलपट सुरू झाली आहे. राबराब राबून जमवलेला पैसा एका क्षणात नोटा बंद झाल्याने हातून जाते की काय? अशी धास्ती सर्वसामान्यांना पडली आहे.
मागील चार दिवसांपासून नोटा बदलविण्यासाठी किंवा नविन नोटा मिळविण्यासाठी नागरिकांनी बँकाची वाट धरली आहे. कधी नव्हे एवढी जणू ‘आर्थिक मंदी’ नागरिक आता अनुभवू लागले आहेत. पैशा हातात असतानाही त्याचा वापर करता येत नाही. अशी स्थिती असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बँक किंवा एटीएममधून पैसा काढण्यासाठी सकाळपासूनच नागरिक रांगेत उभे राहत आहेत.
चलनी नोटा बंद झाल्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना होऊ नये, यासाठी देशभरातील बँका दुसरा शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असताना सुरू ठेवण्यात आल्या. या दोन दिवसात लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार झाला. सोमवारला गुरूनानक जयंती असल्याने सर्व बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार बंद राहणार आहे.
नागरिकांना बसणार फटका
बँकांमधून मिळणाऱ्या तुटपुंजी रकमेसाठी ग्राहकांना ताटकळत रहावे लागत आहे. अशास्थितीतही नागरिक रांगेत उभे राहून मिळणारी रक्कम स्विकारत आहेत. बँकामध्येही पैशाच्या तुटवडा जाणवू लागला आहे. आज गुरुनानक जयंती असल्याने देशभरातील बँकीग व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँका बंद राहणार असल्याने व्यवहारावर परिणाम होणार आहे. अगोदरच तुटपूंजी मदत व अशातच बँक बंद राहील. यासोबत जिल्ह्यातील एटीएम केंद्र नाममात्र झाले असून सर्वत्र पैशाच्या ठणठणाट आहे. उद्या बँक बंद राहणार असल्याने पैशाच्या ‘मेगाब्लॉक’ होणार यात शंका नाही. मंगळवारला बँक पूर्ववत सुरु होणार असले तरी पैसे मिळविण्यासाठी खातेदार बँकासमोर उभे राहतील. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती नाकारता येत नाही.
१०० रूपयांचा तुटवडा
केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांचा नोटा बंद केल्यामुळे २००० रुपयांची नोट बाजारात आली आहे. मात्र त्याचाही अल्प पुरवठा झाल्याने नागरिकांपर्यंत ती पोहोचण्यासाठी अजूनही विलंब झालेला आहे. अशातच १०० रुपयांवर आर्थिक व्यवहार सुरु आहे. मागील आठवडाभरापासून शंभर रूपयांच्या नोटा बाजारपेठेत व्यापारापर्यंत पोहचत आहे. मात्र नविन ग्राहक मोठी रक्कम घेऊन गेल्यास त्यांना चिल्लर नसल्याचे सांगून परत पाठविण्यात येत आहे. यासोबतच बँकामध्येही १०० रुपयांचा चलनी नोटांचा तुटवडा आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे. व्यापाऱ्यांनी १०० रुपयांच्या नोटा दडवून ठेवल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे.
दोन हजार रुपयांचा नोटा प्राप्त झालेल्या आहेत. मात्र एटीएम मशिनमध्ये या नोटा टाकणे शक्य नाही. सर्व बँकांमध्ये रक्कम पोहचण्यासाठी विलंब होत आहे. बाजारपेठेसह राष्ट्रीयकृत बँकेमध्येही शंभर रुपयांच्या नोटेचा तुटवडा जाणवू लागला आहे. उद्या सोमवारला गुरूनानक जयंतीमुळे सर्व बँकींग व्यवहार बंद राहणार आहे. मंगळवारला बँकांचे व्यवहार पूर्ववत सुरु होईल. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टिने अधिकारी काम करीत आहेत.
- विजय बागडे, व्यवस्थापक,
जिल्हा अग्रणी बँक भंडारा