शेतातुन ऐकू येतोय गीतांचा सुमधुर स्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:28+5:302021-07-31T04:35:28+5:30
लाखांदूर : भंडारा जिल्हाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यातील लाखांदूर तालुक्यात बहुतांश भागात धान पिकाची लागवड केली जाते. ...
लाखांदूर : भंडारा जिल्हाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यातील लाखांदूर तालुक्यात बहुतांश भागात धान पिकाची लागवड केली जाते. धान रोवणीचे काम अतिशय कष्टाचे व सदैव वाकून करावे लागते. त्यावेळी शारीरीक कष्टाचे विस्मरण व्हावे व रोवणीचे काम आनंदी वातावरणात हलके व्हावे, यासाठी कामकरी महिला मनोरंजासाठी गीत गायन करीत असल्याने रोवणी दरम्यान शेतात फेरफटका मारल्यास शेतातून गीतांचा सुमधूर स्वर ऐकावयास येत आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामात धानाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामापेक्षा खरीप हंगामात सिंचन सुविधेसह पावसाचे पाणी असल्याने धान लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही धान लागवड रोवणी व आवत्या या दोन पद्धतीने केली जाते.
दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत असली तरी धानाच्या रोवणीसाठीचा पाऊस जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो. एकदा का शेतात पावसाचे पाणी जमा झाले, की रोवणीची कामे अतिशय वेगाने सुरू होतात. आजुबाजुच्या गावांतील महिला एकत्र येतात. रोवणी करतांना २० ते २५ महिला शेतात एकाच पट्ट्याने उभ्या राहतात. त्यानंतर धानाचे पऱ्हे चिखलात कंबरेपासून वाकून लावतात. या कामात रोवणीच्या गाण्यांंने कष्टाचे विस्मरण होते.
साधारणत: महिला रोवणीची गाणी गातांना माहेरची आठवण करणारे गीत गातात. तसेच सासू - सून यांच्यातील संबंध, भाऊ बहीण यांच्यातील हळवे भावस्पर्श असणारी गीते गातात. या गाण्यांत समाजातील विविध स्तर, स्त्रीसुलभ, गरीब - श्रीमंत दरी, नातेसंबंधातील हेवेदावे, विविध श्रद्धा आणि कृषी संस्कृतीतील विविध संकेत असतात. रोवणीचे गाणे ही पारंपरिक पद्धत आहे. चिखलामध्ये वाकून कष्टकरी महिला काम करतात. या कष्टाची जाणीव न होता अतिशय सहज रोवणी व्हावी, या हेतूने महिला धान रोवणी करतांना समुहाने रोवणीची गाणी म्हणत असल्याने शेतांतून सुमधूर स्वर कानी येतात. या गाण्यांत कधी महादेव, तर कधी भुलाबाईची गाणीदेखील ऐकायला मिळतात.
300721\img-20210730-wa0026.jpg
धान रोवणी करतांना गीतगायन करतांना तालुक्यातील सोनी येथील महिला