विद्यार्थ्यांच्या संवादात जिल्हाधिकारी रमले बालपणीच्या आठवणीत
By admin | Published: June 28, 2016 12:35 AM2016-06-28T00:35:15+5:302016-06-28T00:35:15+5:30
शाळेचा पहिला दिवस असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगत शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार होते.
मुख्यमंत्र्यांशी संवाद टळला : एनआयसीतील तांत्रिक बिघाडाचा फटका
भंडारा : शाळेचा पहिला दिवस असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगत शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार होते. मात्र, एनआयसीत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसले; मात्र प्रसंगावधान साधून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विद्यार्थ्यांशी दीड तास वेळ घालवून हितगुज साधला. यावेळी जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वत: विद्यार्थी दशेतील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.
लाखनी तालुक्यातील खराशी व तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शासकीय मदतीची वाट न बघता, येथील शिक्षकांनी स्वमेहनतीवर शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली. यासोबतच येथील शिक्षकांनी अन्य शिक्षकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आदर्श शाळेतील शिक्षणासमान आहे. साने गुरूजींच्या स्वप्नातील शाळा बघायची असल्यास या दोन्ही शाळांना भेट दिल्यास त्याचा अनुभव येतो.
या शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे शिक्षण व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती. याची महती शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेच्या पहिल्या दिवसीच राज्यातील प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. तसे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने खराशी व डोंगरला शाळांना पाठविले. नियोजनानुसार आज मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पालक व शिक्षकांसह उपस्थित झाले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. ठरल्याप्रमाणे वेळ जवळ आली. मात्र त्याचवेळी नॅशनल इंफारमेशन सेंटरमधील पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे बराच वेळ त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातून संपर्क साधण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांशी तांत्रिक बिघाडामुळे संपर्क होऊ शकला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसले. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी त्यांच्याशी दीड तास संवाद साधला. आपल्या शाळेत सुविधा आहेत का, शाळेत शौचालय आहे का, गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळाले का यापासून ज्ञान रचनावादी शिक्षण मिळते अशी आस्थावाईक चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कवितांचे वाचन करुन उपस्थितांना आपल्या ज्ञानाची व पाठांतराची साक्ष दिली. श्रृती नावाच्या विद्यार्थींनीने तर पावसावर तात्काळ कविता लिहून वाचून दाखविली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तिचे जाहिर कौतुक केले. यावेळी शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार यांचेसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
संवादात उलगडला ज्ञानाचा खजिना
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण, भारतरत्न पुरस्कार विजेते कोण, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती, सर्वाधिक जिराफ कोणत्या देशात पहायला मिळतात, भारतातील नोबल पुरस्कार विजेते कोण, अजिंठा-वेरुळ लेण्या कुठल्या जिल्ह्यात आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री कोण? अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना अचूक व विश्वासाने उत्तरे देत विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाची चूणूक दाखविली. सोमवारला शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी धीरजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला.