महिला प्रवासी डब्यातून पुरुषांचा प्रवास
By admin | Published: November 23, 2015 12:34 AM2015-11-23T00:34:38+5:302015-11-23T00:34:38+5:30
महिला व अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने साधारण व एक्स्प्रेस रेल्वेत स्वतंत्र डब्बा सुरु केला आहे.
तुमसर : महिला व अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने साधारण व एक्स्प्रेस रेल्वेत स्वतंत्र डब्बा सुरु केला आहे. पंरतु या डब्यातून पुरुष प्रवाशीच मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे चित्र दिसत आहे. अनारक्षित डब्यातून सर्वसामान्य महिलांना रात्री प्रवास करणे धोक्याचे असते, त्यांना अनारक्षित डब्यात गर्दीमुळे प्रवेश करता येत नाही. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही बाब हेरुन रेल्वे प्रशासनाने अंध-अपंग व केवळ महिला प्रवाशांकरिता सामान्य आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांत अनारक्षित स्वतंत्र डबा लावला या डब्ब्यात महिला तथा अंध-अपंगाची संख्या अल्प दिसते तर उलट पुरुष प्रवासी या डब्यातून नियमबाह्य प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या हेतूला हरताळ फासला जात आहे.
रेल्वे प्रशासनाच्या धडक तपासणी माहिमेत पुरुष प्रवाशांवर कारवाई केली जाते. २०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे त्यांच्या फारसा परिणाम जाणवत नाही. ही कारवाई १५ ते २० दिवसातून एकदा होते. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच राहते. रेल्वे प्रशासनाजवळ रेल्वे पोलीस आहे, परंतु त्यांची संख्याही अत्यल्प आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर या डब्याची सातत्याने तपासणी केली तर पुरुष प्रवाशांची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते. या डब्यात महिला प्रवाशांनीही जागृत राहण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)