पारा @ ४५.५
By admin | Published: May 16, 2017 12:19 AM2017-05-16T00:19:58+5:302017-05-16T00:19:58+5:30
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरीकांसह पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
नवतपापूर्वीच उष्णतेची लाट : बालगोपालांसह नागरिक त्रस्त, रस्ते निर्मनुष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरीकांसह पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. दरवर्षी मे महिन्यात पारा ४४ अंशांच्यावर पोहोचतो. यंदा नवतपापूर्वीच भंडारा जिल्हा तापू लागला आहे. सोमवारी पारा ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यावर्षीचा सर्वाधिक तापमान नोंदविला गेला.
यंदाचा उन्हाळा जीवघेणा आहे की काय? असे वाटू लागले आहे. सकाळी ९ वाजतापसून सुरू झालेली उन्हाची प्रखरता सायंकाळी ५ वाजतापर्यंत कायम राहत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर बघायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र उन्हाची तीव्रता जास्त जाणऊ लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असतो.
यावर्षीचा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास व्यक्त केला जात होता. यावर्षी ६ मार्चला पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. मागील वर्षी म्हणजे मे २०१६ मध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडत १४ मे रोजी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा ४५ अंशांवर गेला होता. मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात होते. सन २०१५ मध्ये २१ मे रोजी तापमान ४६.५ अंश नोंदविण्यात आले होते. यावर्षी १५ मे ला पारा ४५.५ अंश सेल्सिअस या वाढत्या तापमानामुळे हा उच्चांक मोडीत निघाला. चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरली आहे.
नवतपा २५ मे पासून
संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. मे महिन्याच्या २५ तारखेपासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. नवतपा प्रारंभ व्हायला १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे परंतु भंडारेकर नवतपापुर्वीच उन्हाची दाहकता अनुभवत आहेत.