पारा आठ अंशावर, गारठा वाढला
By admin | Published: December 29, 2014 11:36 PM2014-12-29T23:36:36+5:302014-12-29T23:36:36+5:30
बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती असून येत्या ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र बनण्याचे संकेत आहेत. बंगालपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याने विदर्भातील तापमानात
भंडारा : बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती असून येत्या ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र बनण्याचे संकेत आहेत. बंगालपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याने विदर्भातील तापमानात चढउतार होत आहे. दोन दिवसांपासून विदर्भात हलके वारे वाहू लागल्याने दिवसाही नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आज पारा आठ अंशावर नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.
हिमालयात पश्चिमी विक्षेप सक्रिय असल्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण असून ३१ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण वाढल्यास विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली. त्याचा प्रभाव विदर्भावरही होत आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान ३०-३१ व रात्रीचे तापमान ११ ते १५ डिग्री सेल्सिअस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात ५ ते १० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत असल्याने थंडी वाढली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात पारा सर्वाधिक घसरण्याची नोंद सोमवारला करण्यात आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)