सोशल मीडियावरील चार लाखांच्या मदतीचा तो मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:56+5:302021-09-02T05:15:56+5:30
भंडारा : कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळणार असल्याचा एक बनावट मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत ...
भंडारा : कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळणार असल्याचा एक बनावट मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत असून या खोट्या मेसेजमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या अनेकजण याची चर्चा करीत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील अर्ज भरुन जिल्हा कार्यालयात अर्ज देण्यासाठी आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने हे अर्ज स्वीकारले नाहीत. अशा प्रकारची कोणतीही योजना सुरू नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. अशा प्रकारच्या फेक मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन तर्फे करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे माहिती घेतली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील अनेकजण विचारपूस करीत असल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारच्या योजनांसाठी कुणीही चुकीच्या भूलथापांना बळी न पडता अर्ज करू नये असे सांगण्यात येत आहे. या अर्जांचे करणार काय....
सोशल मीडियावरील त्या मेसेजमध्ये अर्जाचा नमुना दिला आहे. त्या अर्जाच्या नमुन्याची झेरॉक्स काढून त्यातील संपूर्ण माहिती भरुन अनेक लोक हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यासाठी आले होते. मात्र प्रशासनाने अशा प्रकारची कोणतीही योजना सुरू नसल्याचे सांगत अर्ज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी अशा खोट्या संदेशामुळे वाढली आहे.
कोट
शासनाने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. जर कोणतीही योजना शासनाने जाहीर केल्यास तसा लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असतो. मात्र या योजनेसंदर्भात कोणताही लेखी आदेश जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. अशा फसव्या,चुकीच्या संदेशाला कोणीही बळी पडू नये.
अभिषेक नामदास,
जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी, भंडारा