पांदण रस्त्याच्या कामावर ‘गोदरीमुक्ती’चा संदेश
By admin | Published: February 6, 2017 12:25 AM2017-02-06T00:25:00+5:302017-02-06T00:25:00+5:30
हागणदारीमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी योजना करीत आहेत.
पवनारखारीत रोहयो कामावर सभा : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
भंडारा : हागणदारीमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी योजना करीत आहेत. गुडमॉर्निंग पथक भल्या पहाटेच गावात दाखल होऊन उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शौचालय बांधण्याचा संदेश देत आहे. यात आता रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना शौचालय बांधण्याचे व वापरण्याचा सल्ला दिल्या जात आहे. हा एक महत्वपूर्ण मार्ग प्रशासनाने निवडला आहे.
स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुका ओ.डी.एफ. अंतर्गत हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासन आता उघड्यावर जाणाऱ्यांशी दोन हात करण्यास सज्ज झाले आहे. उघड्यावर शौचास जात असल्याने त्या माध्यमातून निर्माण होणारी दुर्गंधी व याचे आरोग्यावर पडणारे विपरीत परिणाम याची माहिती या कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दिल्या जात आहे. अनेकांना त्यांनी दिलेल्या उपदेशाचे महत्त्व पटल्याने शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आल्याची फलश्रूती दिसू लागली आहे. ग्रामीण स्तरावर नागरिकांना गावात उपदेश देण्याचा प्रकार आजतागायत बघितला. मात्र आता ग्रामस्थ रोजगार हमी योजनेच्या कामावर एकत्र राहत असल्याने तिथेच त्यांना कामातून वेळ काढून शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सध्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहेत.
या कामावर असलेल्यांना देण्यात आलेले मार्गदर्शन शौचालय बांधण्यासाठी व गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी महत्वाचे ठरत आहे. मार्च पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी सज्ज झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांकडूनही शौचालय बांधकाम करण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
शौचालय बांधा, आरोग्य जपा
विवाहित महिलेच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र ज्या प्रमाणे सौभाग्याचे लेणे मानले जाते त्याचप्रमाणे शौचालय महिलेच्या इज्जतीचा दागिना असल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी तुमसर पंचायत समिती अंतर्गत पवनारखारी येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सरपंच कविता बोमचेर, ग्रामपंचायत सदस्य हरिप्रसाद गाढवे, संजय बोमचेर, राजेश येरणे, पल्लवी तिडके, शशीकांत घोडीचोर, पौर्णिमा डुंभरे, वर्षा दहिकर, राजेश मेश्राम, विनोद मेश्राम, विनोद सयाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी गाव हागनदारीमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा व शौचालयाची पाहणी
पवनारखारी हागणदारीमुक्त करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी सर्व प्रथम ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेशी संवाद साधला. शौचालयाबाबतची स्थिती जाणून घेतली व शक्य तितक्या लवकर शौचालयाचे निर्माण करून गाव हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रोहयो कामावर महिला पुरुषांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधून स्वच्छतेच्या सुविधेचे बांधकाम करून व वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पवनारखारी येथे ज्या कुटुंबंनी शौचालयाचे काम केले त्यांच्या घरांना भेटी देवून शौचालयाचीपाहणी केली व ज्यांनी बांधकाम केले नाही त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेवून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन गाव निरोगी बनविण्यासाठी ग्रामस्थ आता पुढाकार घेऊ लागले आहेत.