‘मेस्टा’ने दिला शाळा बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:12 AM2017-12-13T00:12:19+5:302017-12-13T00:12:46+5:30
महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन भंडारा ‘मेस्टा’ च्या बैठकीत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ डिसेंबरला शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन भंडारा ‘मेस्टा’ च्या बैठकीत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ डिसेंबरला शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्च्याच्या आयोजनासंबंधी चर्चा झाली.
सदर बैठक मेस्टाचे संस्थापक अध्यक्षतेखाली येथील जेसीस कॉन्व्हेंटमध्ये पार पडली. यावेळी मेस्टाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वैद्य, शत्रुध्न भांडारकर, राकेश गजभिये, तथागत मेश्राम, तरोणे, कावळे, लोखंडे आदी उपस्थित होते. बैठकित अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्च्याच्या आयोजनासंबंधी चर्चा करण्यात आली.
या महामोर्च्यात जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांनी व मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळा बंद ठेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रलंबित असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आलेल्या विषयांमध्ये शाळेसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, आर.टी.ई. (राईट टू एज्यूकेशन) कायद्याप्रमाणे मोफत प्रवेशाचा रखडलेला निधी तात्काळ वाटप करण्यात यावा, स्कूल बसला कोणताही अतिरिक्त कर आकारण्यात येऊ नये, इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना किमान योजना सुरू करण्यात यावी, इंग्रजी शाळेच्या शिक्षकांचा १० लाखांचा विमा सरकारतर्फे उतरण्यात यावा, इंग्रजी शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी, इंग्रजी शाळांना फी रेग्युलेशन कायदा लागू करू नये, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, इंग्रजी शाळांना स्थलांतरणाची परवानगी देण्यात यावी, नैसर्गीक वाढ व दर्जा वाढ त्वरित देण्यात याव्यात, इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सुरू करण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. विद्यार्थी शिक्षक व संस्था चालक यांच्या रास्त मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.