वृक्ष लागवड मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:47 PM2018-04-10T23:47:46+5:302018-04-10T23:47:46+5:30
जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या पावसाळयात भंडारा जिल्ह्यात २० लाख १९ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सूर्यवंशी म्हणाले, वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात वनविभागाला अहवाल पाठविण्यात यावा. १२ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित कराव्यात. खड्डे खोदण्याचे नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांनी मोकळया जागा शोधून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून लोकांचा सुध्दा आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सामाजिक संस्थांना सहभागी करावे. मोठया प्रमाणात लोकसहभाग घ्यावा. वृक्ष लावणे सोपे काम असून वृक्षसंवर्धन कठीण काम आहे. वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संगोपनासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. संगोपनासाठी वृक्ष दत्तक योजना राबविल्यास फायदेशिर ठरेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
मागीलवर्षी जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून १३ लाख ३२ हजार वृक्ष लागवड केली होती. मागील वर्षी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत जगलेल्या रोपांचा अहवाल तातडीने वन विभागाला पाठविण्याच्या सूचना सुर्यवंशी यांनी केल्या. वृक्ष लागवड मोहीम ही औपचारिकता नसून भविष्याची गरज असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. आपल्या पिढीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड मोहिम गांभिर्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागानी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
असे आहे लागवडीचे उद्दिष्ट
भंडारा जिल्ह्याला यावर्षी शासनाने २० लाख १९ हजार १४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात वनविभाग ९ लाख ३० हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जिल्हा परिषद ग्रामपंचायत ५ लाख ८९ हजार १४० व इतर शासकीय विभागांना १ लाख ९७ हजार १६० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.