लष्करी अळींचे आक्रमण; धानपीक धोक्यात
By admin | Published: August 21, 2016 12:24 AM2016-08-21T00:24:41+5:302016-08-21T00:24:41+5:30
पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे.
मंडळ कृषी अधिकाऱ्यांची शिवारफेरी : अळीच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन, निंबोळी अर्काचे वाटप
मुखरु बागडे पालांदूर
पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे. यामुळे धानपिक संकटात सापडले आहे. शेतकरी घाबरला असून त्यांच्या मदतीकरिता मंडळ कृषी कार्यालयाची चमू थेट बांधावर फेरी घालत अळींच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन करीत आहे.
ग्रामपंचायत व बैठकीच्या ठिकाणी चर्चासत्राचे नियोजन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता अळींच्या नियंत्रणाचे आवाहन प्रभारी मंडळ कृषी अधिकारी अनिल शहारे यांनी केले आहे.
१५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता असून तापमानात वाढ झाली आहे. यामुळे हवामानात बदल येऊन लष्करी अळी, खोडकिडी, गादमाशीला पोषक वातावरण तयार झाल्याने अळींचे वाढतच चालले आहे. ज्या भागात रोवणी उशिरा झाली. पाऊस कमी पडता किंवा बांध्यात पाणी नसल्या ठिकाणी अळीने आक्रमण करुन धानपिक नष्ट केले आहे. शिवारफेरीत नुकसानग्रस्त शेतकरी जगदीश हटवार यांच्या शेतात लष्करी अळीचे जोरदार आक्रमण आढळले. पाणी नसल्याने समस्या आणखी वाढली. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, कृषी सहायक श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, परसराम भुते, नंदनवार यांनी अभ्यास केला. अळी नियंत्रणाकरिता डायक्लोरोव्हास ७६ ईसी १० लीटर पाण्यात १२.५ मि.मी. किंवा क्लोरोफारॉफॉस यांचे मिश्रण २५ एमएल १० लीटर पाण्यात म्हणजे १५ लिटर पाण्यात ३५ मिली औषधाची मात्रा स्वच्छ पाण्यातून फवारणी करावी. बांध्या स्वच्छ ठेवावे, पिकांवर नियंत्रित लक्ष ठेवून मंडळ कृषी कार्यालयाला भेट देत समस्यांशी निगडीत चर्चा करण्याचे आवाहन केले
महागाईचा सामना करताना शेतकरी कमी पडत आहे. कृषी केंद्रातून किटकनाशक खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते. नेमक्या औषधींने किड नियंत्रणात येताना दिसत नाही. एका सोबत २ ते ३ औषधांचे मिश्रण फवारावे लागते. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानावर मोफत किटकनाशक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्वरीत करावी.
- जगदीश हटवार,
नुकसानग्रस्त शेतकरी, पालांदूर.