पाण्यापेक्षाही दूध झाले स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:02 AM2018-01-23T00:02:31+5:302018-01-23T00:02:59+5:30
कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे.
राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे. अशातच शासनाने दुधाचे दर ६ रूपयाने कमी करून पाण्यापेक्षाही दुध स्वस्त करून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखविल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.
एकीकडे शासन गोरक्षणावर भरमसाठ पैसा खर्च करीत आहे तर दुसरीकडे चाऱ्यांच्या किंमती भयावह वाढविल्या आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. आधीच धानाला कमी भाव आहे. त्यातही यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना शासनाने दुधाचे दर २५ रूपयांवरून १९ रूपये करून ६ रूपयांनी घटविले आहे. बाजारात मिनरल वॉटर २० रूपयाला मिळते. ईथे शासनाने पाण्यापेक्षाही दुधाचे दर कमी करून टाकल्याने शेतकºयांच्या कष्टाची थट्टा सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांत असंतोष धुमसत आहे. दुधाला योग्य दर मिळवून द्यावा, अशी अपेक्षा गोपालक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र व राज्य शासन हे उद्योगपतीचे असून शेतकरी विरोधी आहे. दुधाला योग्य दर मिळवून देण्यासाठी व दुध संकलनाकरिता शासकीय व्यवस्था करण्याकरिता काँग्रेसतर्फे आंदोलन उभारण्यात येणार आहे.
- प्रमोद तितिरमारे, शेतकरी तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी.