बंद असतानाही फिरते पीठ गिरणीचे मीटर
By admin | Published: December 27, 2014 01:08 AM2014-12-27T01:08:33+5:302014-12-27T01:08:33+5:30
अनेकदा चकरा माल्यानंतर करडी विद्युत विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये बोरगाव येथील आटाचक्की मालक अभिमन अतकरी यांचे चक्कीला मीटर बसविले.
करडी/पालोरा : अनेकदा चकरा माल्यानंतर करडी विद्युत विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये बोरगाव येथील आटाचक्की मालक अभिमन अतकरी यांचे चक्कीला मीटर बसविले. परंतु मीटर बंद असतानाही आकडे सतत बदलत असतात. त्यामुळे आटा चक्कीचे बिल अव्वाच्या सव्वा येत आहेत. अतिरिक्त बिलामुळे मालक त्रस्त असून चक्कीच बंद करण्यापर्यंत मानसिकता ठासळली आहे.
करडी येथील विद्युत विभागाच्या बेबंदशाही धोरणामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. आता व्यावसायिकही नाहक बळी ठरत आहेत. बोरगांव येथील आटाचक्की मालकाला सदोष मीटर बसविण्यात आले. आटाचक्की बंद असतानाही मीटर सतत फिरत असते. त्यामुळे रिडिंग वाढत जाऊन महिन्याचे विजेचे बिल फुगून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१४ चे वीज बिल ३ हजार ८०० रुपये पाठविण्यात आले.
वीज बिलामुळे अभिमन अतकरी यांचे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. विनाकारण आर्थिक भुर्दंड त्यांना दिला जात आहे. वीज वितरण कंपनी शाखा करडीचे लाईनमन बेहलपाडे रिडींग घेण्याकरिता प्रत्यक्ष आले असता त्यांनीसुध्दा मीटर दोष पाहिला आहेत. त्वरित मीटर बदलवून नवीन मीटर लावण्याची मागणी अतकरी यांनी केली आहे. (वार्ताहर)