धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी
By युवराज गोमास | Published: November 20, 2023 02:23 PM2023-11-20T14:23:34+5:302023-11-20T14:23:54+5:30
जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष
भंडारा : 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट होते. दिवाळीपूर्वी नागरिकांनी आपआपल्या घर व परिसराची स्वच्छता केली असताना प्रशासनाने दिवाळीनंतर शहरातील रस्त्यांची, नाले, गटारांची व रस्त्यांच्या कडांची स्वच्छता केली. दुर्गंधीयुक्त घनकचरा तातडीने उचलून विल्हेवाट लावली.
शहरात सातत्याने धूळ प्रदुषण असतांना प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करून होते. शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. परंतु, राज्यकर्ते शहरात येण्यापूर्वीच सकाळीच अनेक टँकरच्या माध्यमातून करोडो लिटर पाणी रस्त्यांवर ओतून आपले पाप लपविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतोष नागरिकांत व्यक्त होत आहे.
भंडारा शहरात गत दोन वर्षांपासून प्रचंड धूळ पदुषण आहे. रोज स्वच्छता न केल्यास घरात धुळीचा थर साचतो. स्वच्छ कपडे घालून बाहेर पडताच कपडे मळतात. पांढरे कपडे लाल झालेले दिसून येताच. शहरात धुळ पदुषणाचा स्तर सातत्याने वाढता आहे. परंतु, नगर पालिका प्रशासन व जिल्हा पदुषण नियंत्रण विभाग याकडे डोळेझाक करून आहे.
हिरवेगार व स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न भंगले
भंडारा शहरात धूळ प्रदुषणामुळे श्वसन व डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहे. अनेकांचा दमा विकाराने ग्रासले आहे. हिरवेगार शहराचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अरूंद रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली असून वाहतुकीची कोंडी नेहमीची बाब झाली आहे. फुटपाथ व्यावसायिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
अंतर्गत रस्त्यांचे बेहाल
शहरात पावसाळ्यापर्यंत गटार लाइन टाकण्यासाठी अंतर्गत सर्व पक्के सिमेंट रोड व डांबरीकरण रस्ते खोदण्यात आले. पाईप लाइन टाकल्यानंतर केवळ मातीने बुजविण्याचे आले. त्यामुळे संपूर्ण पावसाळा नागरिकांना चिखलातून काढावा लागला. अद्यापही अनेक रस्ते मजबूत करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.
शहरात स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभरापासून मिळत नाही. अनेकांच्या नळाला दूषीत पाणी पुरवठा होत आहे. वर्षभर स्वच्छतेचा अभाव असतो. रस्त्यांची दूरवस्था आहे. प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केवळ एक दिवसासाठी करोडे लिटर पाणी रस्त्यांवर ओतणे चुकीचे व दुर्भाग्यपूर्ण आहे.
- भगीरथ धोटे, नागरिक, भंडारा.
हा जिल्हा प्रशासनाचा दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरात रोड-रस्त्यांचे बेहाल आहे. दुषीत पाणी पुरवठा होत आहे. गटार लाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहेत. शहरात धुळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. परंतु, यावर उपाययोजना होत नाही.
- गोपाल सेलोकर, नागरिक, भंडारा.