लाखांदुरात नवरदेवाची वरात निघाली दमणीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:06 PM2019-06-12T22:06:48+5:302019-06-12T22:07:51+5:30
प्रवासाची वेगवान साधने असलेल्या युगात दमनीतून काढलेली वरात सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. वयाची पन्नासी पार केलेल्या अशा अनेक वराती अनुभवल्या असतील मात्र आधुनिक युगात लाखांदूरात एका शेतकरी पुत्राची वरात चक्क दमणीतून तेही वाजतगाजत काढण्यात आली.
दयाल भोवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : प्रवासाची वेगवान साधने असलेल्या युगात दमनीतून काढलेली वरात सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. वयाची पन्नासी पार केलेल्या अशा अनेक वराती अनुभवल्या असतील मात्र आधुनिक युगात लाखांदूरात एका शेतकरी पुत्राची वरात चक्क दमणीतून तेही वाजतगाजत काढण्यात आली. जुन्या काळातील वरातीचा आनंद नवीन पिढीलाही लुटता आला.
अलीकडे गावागावांत प्रवासाची साधने वाढली आहे. विविध आलीशान वाहनातून वराती काढल्या जातात. घोड्यावर बसून नवरदेव मंडपापर्यंत पोहोचतो, काही ठिकाणी हौशी नवरदेव मोटारसायकल व इतर वाहनाचाही वापर करतात. परंतु लाखादूर येथील कुथे कुटुंबातील नवरदेव चक्क दमनीत बसून आला. रंगीबेरंगी झुली पांघरलेले बैल दमनीला जुंपण्यात आले होते. बैलांच्या गळ्यात घुगर माळा, पायात चाळ आणि दमनीच्या चाकाना घुंगरे बांधण्यात आली होती. येथील टी-पॉर्इंटवरुन वाजत गाजत ही वरात लग्नमंडपापर्यंत काढण्यात आली. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. कुथे परिवाराचे शेती आणि बैलांशी नाते कायम आहे. त्यामुळेच त्यांनी पर्यावरण पुरक अशा दमनीचा वापर करुन नवरदेवाची वरात काढली.
ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या या दमनीची वरात तरुणांईने अनुभवली. अनेकजण या दमनीच्या मागेपुढे धावत होते. तर काहीजण परंपरागत वाद्यावर नृत्य करीत होते. लाखांदूर परिसरात आता कुथे परिवाराच्या या आगळावेगळ्या वरातीची चर्चा असून नव्या पिढीला या वरातीमुळे जुन्या काळातील दमनीचे दर्शन झाले.