कोट्यवधींची जागा बेवारस स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:32 PM2017-12-01T22:32:38+5:302017-12-01T22:32:58+5:30
इंद्रपाल कटकवार
भंडारा : शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने हात वर केले आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निश्चित असलेल्या कोंडवाड्याची (कांजी हाऊस) कोट्यवधींची जागा सध्या बेवारस स्थितीत आहे. राजकीय उदासिनता व निधीची वाणवा या दोन प्रमुख गोष्टी समस्येच्या निराकरणाला आडकाठी ठरत आहे.
जिल्हा मुखालयी असलेल्या भंडारा शहराची व्याप्ती दिवसेंगणीक वाढत आहे. अशा स्थितीत वाढत्या नागरीकरणासोबतच रहदारीची समस्या बिकट होत आहे. त्यातल्या त्यात भर रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. समस्या लहान असली तरी यापासून होणारे दुष्परिणाम मोठे आहेत.
भंडारा पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाºया मुख्य बसस्थानकाच्या समोर तर दुरसंचार विभाग कार्यालयाला लागृन कोंडवाड्यासाठी प्रशस्त जागा आहे. जवळपास दहा हजार स्क्वे.फूट ही जागा असून यात फक्त जंगली झुडपी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या जागेचा उपयोग शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्यासाठी होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी पैशांची टंचाई व चाºयाचा प्रश्नामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सन २०१६ मध्ये ही पालिकेचे मुख्याधिकारी यांनी मोकाट जनावरांचा तसेच कोंडवाड्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येवून कायम स्वरुपी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
परंतु माशी कुठे शिंकली कुणाच ठाऊक. स्थिती जैसे थे आहे. सध्या स्थितीला कोंडवाड्याची ही ऐन मोक्यावरची जागा बेवारस स्थितीत आहे. मोकाट जनावरे शहरातील रस्त्यांवर फिरत आहेत. मात्र या समस्येकडे ना पालिका ना स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन सोडविण्याचा प्रयत्नात दिसत नाही. नागरिक ही संयम बाळगून आहेत.