खस, वुडवूलच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:29 AM2017-03-17T00:29:07+5:302017-03-17T00:29:07+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच खस, वुडवूलची मागणीही वाढू लागते. या मागणीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते.
आला उन्हाळा : बेरोजगारीवर मात, सालेभाटा, धारगाव येथील विक्रेते भंडाऱ्यात
भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच खस, वुडवूलची मागणीही वाढू लागते. या मागणीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते. होळीचा सण आटोपला असून उष्णतेत दिवसेंगणिक वाढ होत असल्याचे दिसून येत असून कुलरच्या ताट्या व वुडवूलच्या मागणीत वाढ होत आहे.
दरवर्षीप्रमाणे लाखनी तालुक्यातील सालेभाटा, साकोली तालुक्यातील धानोड व भंडारा तालुक्यातील धारगाव येथील काही कुटूंब खस तथा वुडवूलचा व्यवसाय करण्यासाठी भंडाऱ्यात डेरे दाखल झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग तथा शहरातील मुख्य मार्गांवर खस व वुडवूल विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे.
उन्हाळा सुरू होताच नागरिकांचा कल थंड पेय तथा घरातील वातावरण थंड करण्यासाठी कुलरचा वापर करतात.
सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कुलरचे रिपेरिंगची कामे होत आहेत. यासाठी खस तथा वुडवूलची मागणीही वाढली आहे.
वुडवूल २० रूपये किलो तर कुलरची ताटी प्रती सेटप्रमाणे १२० ते १५० या भावाने विक्री होत आहे. खस हा गोंदिया जिल्ह्यातील ऊडूसा येथून पेंडीच्या भावाप्रमाणे खरेदी करून आणला जातो. याशिवाय ताटीसाठी लागणारे साहित्य नागपूर येथून बोलविले जाते. हंगामी व्यवसाय असल्याने जवळपास तीन महिन्यापर्यंत या रोजगारावर आधारित कुटूंब आपला चरितार्थ चालवितात. (प्रतिनिधी)