मॅग्निज खोदकामासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 03:19 PM2022-02-02T15:19:27+5:302022-02-02T15:26:07+5:30
चिखला येथील ब्रिटिशकालीन मॅग्नीज खाण भूमिगत असून खाणींचे क्षेत्र मोठे आहे.
मोहन भोयर
भंडारा : चिखला येथे भूमिगत मॅग्निज खाणीलगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतांवर खाण प्रशासनाने कब्जा करून अद्यापही मोबदला दिला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २००८ मध्ये ही शेती हस्तगत करून मोठी यंत्रसामग्री शेतात लावण्यात आली आहे तर दुसरीकडे शेतकरी मोबदला आणि मुलांच्या नोकरीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत.
चिखला येथील ब्रिटिशकालीन मॅग्नीज खाण भूमिगत असून खाणींचे क्षेत्र मोठे आहे. २००८ मध्ये चिखला येथील संपत बांगरे यांची पाच एकर शेती खाण प्रशासनाने घेतली. एकरी पाच लाख रुपये व मुलाला नोकरी देण्याच्या निर्णय झाला. शेतीवर कब्जा करून यंत्रसामग्री लावण्यात आली संपूर्ण शेतीला संरक्षण भिंत बांधली; परंतु शेतीचा मोबदला व मुलाला नोकरी दिली नाही. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली; परंतु कोणतीच दखल झाली नाही.
चिखला खाणीजवळील शेताच्या गटक्रमांक ६४५ ,४०७, ६४४, ५९९ आदींवर खाण प्रशासनाने कब्जा केला आहे. या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाचे मॅग्निज आहे. त्यामुळे खाण प्रशासनाचा या शेतीवर डोळा होता. नवीन भूमिगत खाण या शेतशिवारात तयार झाली असून यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करण्यात आली आहे.
खाण परिसरात सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे वनकायदेही खाण विस्तारीकरणात अडथळा ठरत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या विचारात खाण प्रशासन आहे. येथील शेतकरी शेत जमिनी देण्यास तयार आहेत; परंतु बाजारभावाप्रमाणे शेतीचा मोबदला व कुटुंबातील एकाला खाणीत नोकरी देण्याची मागणी आहे. खाण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.
२००८ मध्ये पाच एकर शेतीवर खाण प्रशासनाने कब्जा घेतला. शेतात यंत्रसामग्री उभी केली आहे. संपूर्ण शेताला कुंपण घातले आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे एकरी पाच लाख रुपये व मुलाला नोकरी अद्याप मिळाली नाही. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे परंतु अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही.
- संपत बांगरे, शेतकरी, चिखला
चिखला येथील संबंधित शेतकऱ्याला बुधवारी चिखला खाण कार्यालयात बोलावण्यात आले आहे. भूगर्भशास्त्र तज्ज्ञांमार्फत संबंधित शेतीची माहिती जाणून घेतल्या जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-विकास परिदा खान प्रतिनिधी, चिखला खाण