खाण चिखला येथे, सदनिका सीतासावंगीत
By admin | Published: April 7, 2017 12:38 AM2017-04-07T00:38:36+5:302017-04-07T00:38:36+5:30
चिखला भूमीगत खाणीत कार्यरत कामगारांच्या सदनिका चिखला गावात करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चिखला ग्रा. पं.चा विरोध : गाव भकास होण्याच्या मार्गावर
तुमसर : चिखला भूमीगत खाणीत कार्यरत कामगारांच्या सदनिका चिखला गावात करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने नागपूर येथील मॅग्नीज ओर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदन पाठविले आहे.
चिखला भूमीगत खाणीच्या कामगारांच्या सदनिका बांधकामाला मंजूरी मिळाली आहे. चिखला गाव शिवारातील दुर्गा चौक परिसरात सदनिकेचे बांधकाम करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कामगारांना खाणीत ये-जा करण्याकरिता त्रास होणार नाही येथील कामगारांच्या सदनिका सीतासावंगी या गावात यापूर्वी बांधण्यात आल्या होत्या. यापूर्वी चिखला गावात मोठी व लहान मॉयल तथा बाबू लाईन येथे कामगारांच्या सदनिका होत्या. त्या सदनिकांना मॉयल प्रशासनाने भूईसपाट केले. येथील कामगाराना मॉईल प्रशासनाने सीतासावंगी येथे स्थानांतरीत केले होते. या कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांची नावे चिखला येथील मतदारयादीत आहेत. त्यांच्या कुटूंबियांना सर्वच प्रमाणपत्रे चिखला ग्रामपंचायत देत आहे. मॉयलची खाण चिखला गावाच्या नावाने आहे. मॉयल प्रशासन सर्वच बांधकामे सीतासावंगी येथे करीत आहे. याचा लाभ चिखला गावाला मिळत नाही. गावाला कर मिळत नाही, विकास कामे करताना ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहे. चिखला गावाची लोकसंख्या १५ वर्षापासून पाच हजार इतकीच आहे. त्यात वाढ होत नाही. बाजारपेठा बंद झाल्या आहेत. गाव भकास होण्याच्या मार्गावर आले आहे.
यासंदर्भात चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, शरीफ पठाण, किशोर बनमारे, शेख इसराईल, प्यारेलाल धारगावे, सुरज वरखडे, संगीता अग्रवाल, दुर्गा उईके, गीता टेंभरे, किशोर हुमने, गोदावरी सोनवाने, दिनेश कटौते, श्रीराम कापगते, शंकर झोडे, रमेश अग्रवाल यांच्यासह चिखला ग्रामस्थांनी खासदार प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांना निवेदन पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)