मिनी मंत्रालयाचा वीज पुरवठा दिवसभर गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:13 AM2019-06-14T01:13:42+5:302019-06-14T01:14:13+5:30
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
जिल्हा परिषदेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची दहा दिवसातील ही दुसरी घटना होय. जिल्हा परिषदेत जवळपास १७ पेक्षा अधिक विभाग असून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यात अजून वाढ झाली आहे. त्यातच नवीन इमारतींमध्ये एसी लावल्यामुळे त्याचा भार ही जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या विद्युत पुरवठ्यावर देण्यात आला आहे. अचानक मोठा स्फोट झाल्याने कर्मचाऱ्यांसह आलेल्या नागरिकांनी विजेचे मीटर लागलेल्या भागाकडे धाव घेतली. यावेळी एमसीबी जवळील केबल जळत होता. याचवेळी एका कर्मचाºयाने अग्नीशमन यंत्र (सिलिंडर)च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. उन्हाळ्याचे दिवस असून वारंवार अशा प्रकार घडत असतानाही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत.
नवीन डीपीचा प्रस्ताव रखडला
जिल्हा परिषदेच्या कामाची व्याप्ती मोठी असल्याने इमारतीला लागणाºया विद्युत पुरवठ्यातही वाढ करण्याची गरज लक्षात घेता, त्यासाठी स्वतंत्र डीपी लावण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात नवीन डीपी बसविण्याबाबत निधी मंजूर असून टेंडरींगच्या कामात विलंब होत असल्याने नवीन डीपी बसविण्यासाठी वेळ लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना व निधी मंजूर झालेला असतानाही प्रक्रिया का अडविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोनवर्षांपूर्वी झाले होते केबलचे अपडेशन
जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील पश्चिम दिशेकडील भागात विजेचे केबल व मीटस बसविण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मिटरची व एमसीबीची व्यवस्था आहे. मात्र गरजेपेक्षा पुरवठा कमी व लोड येत असल्यामुळे वारंवार स्फोट होऊन आग लागण्याची घटना घडत आहेत. जवळपास दोन वर्षांपुर्वी जिल्हा परिषदेतील विद्युत पुरवठ्याच्या केबलचे अपडेशन करण्यात आले होते. त्यानंतरही अशा घटना घडल्या आहेत.