गलथानपणा चव्हाट्यावर, जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ढिम्मच; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा बट्ट्याबोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 05:00 PM2023-10-17T17:00:44+5:302023-10-17T17:05:33+5:30
अस्ताव्यस्त कचरा अन् तुंबलेली गटारे : जिल्हा रुग्णालयाच प्रशासनाचा भोंगळ कारभार
इंद्रपाल कटकवार
भंडारा : जिथे आपण आपले आरोग्य सुदृढ करण्यासाठी जात असतो तोच परिसर अस्वच्छतेने माखला असेल तर आरोग्य ही सेवा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. असाच प्रकार सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसराची पाहणी केल्यानंतर आढळला. आठ दिवसांपूर्वी स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आला, मात्र जिल्हा रुग्णालय परिसरात पसरलेला अस्तव्यस्त कचरा आणि तुंबलेली गटारे पाहून जिल्हा रुग्णालय प्रशासन कारभार ढिम्मच काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो.
४०० खाटांचे जिल्हा रुग्णालय सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहे. बाह्यरुग्ण विभागाच्या मागे असलेल्या वॉर्डाच्या इमारतीच्या मधात मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. या परिसरात नालीचेही बांधकाम झालेले नाही. विशेष म्हणजे यालाच लागून ऑक्सिजन निर्मितीचे केंद्रही आहे. याच्यासमोर कोरोनाकाळात सुरू असलेला ‘कोरोना ब्लॉक’ होता.
यालाच लागून इमारतीचेही बांधकाम करण्यात आले आहे. याच इमारतीमध्ये कोरोना रुग्णांची विविध तपासणी केली जायची. या परिसरातही कचरा पाहायला मिळतो. शवविच्छेदन गृह परिसरातही झाडी झुडपी वाढली असून येथून सहसा नागरिक जात नाही.
वाॅर्ड असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील एका मोठ्या कक्षामध्ये खाली बेड ठेवण्यात आले आहे. किंबहुना येथे काही काम सुरू असल्याचेही जाणवते. पहिल्या व दुसऱ्या माळ्यासह तळ मजला चकाचक व रोशनीयुक्त आहे. मात्र, याच इमारतीचे बाह्य आवरण मात्र गलिच्छ दिसून येते. नाका-तोंडावर रुमाल घेतल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही.
रुग्णालय प्रशासन दखल घेणार काय?
जिल्ह्याच्या तुमसर ते लाखांदूर तालुक्याच्या टोकावरील रुग्ण उपचारार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येत असतात. त्यामुळे या परिसराची स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध पाणी मिळणारे आरओ केंद्र परिसरातही नाल्याची अव्यवस्था आहे. सायकल स्टॅन्ड किंवा दुचाकी ठेवण्याच्या जागेतही मोठ्या प्रमाणात केरकचरा साचलेला आहे. रुग्णालयाच्या कंपाउंड भिंतीच्या आडोशाला नागरिक लघुशंकेसाठी जात असतात. फक्त रुग्णालयाच्या आतच स्वच्छता दिसून येते बाहेर मात्र अस्वच्छतेचा विळखा आहे. याकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन गांभीर्याने पाहणार काय?
जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी
‘स्वच्छता हीच सेवा’ या सप्ताहांतर्गत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी खुद्द जिल्हा रुग्णालयात पोहोचून पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला होता. बाह्य रुग्ण विभागासह वाॅर्डांची व प्रशासकीय इमारतीची पाहणी केली होती. मात्र, या इमारतींच्या बाह्य भागात असलेल्या अस्वच्छतेचे त्यांनी पाहणी केली नाही काय, असा सवालही उपस्थित होत आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेले जिल्हा रुग्णालयाच्या अव्यवस्थेकडे व अस्वच्छतेकडे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे, असा सूर उमटत आहे.